मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३२६ ते ३३०

पदसंग्रह - पदे ३२६ ते ३३०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३२६.  (चा. साकी)
ह्मणवुनि सावध रे ॥ दुर्धर हे रिपु साही ॥धृ०॥
ज्ञानी पंडित लुंचित मुंडित साधक भोगी त्यागी । निगमपरायण जोतिषी वैदिक दिक्षित कर्मठ योगी ॥
संन्यासी दिगंबर शिष्टतपोनिधी मौनि आणि वीतरागी ॥ सर्वां वनिता मूळ अनर्था पाहातां प्रत्यक्ष आगी ॥१॥
नलगत पळ ही चित्त विमोही ईक्षणमात्नें नाडी ॥ दारुण बाणीं वेधी प्राणी तदुपरि कामें ताडी ॥
अर्थें प्राणें बुडवुं जाणें वशीक कर्में गाढी ॥ व्याध वनांतरीं सावध जैसा तैसा नरमृग पाडी ॥२॥
ह्मणवुनि काळें जनिली पैं ही मूर्तिमंत भवव्याधी ॥ हे राहो विपरीत पाहाहो सावध होउनि आधीं ॥
हरिभक्त सदां नर त्यासि दिवाकरनंदन-भृत्य न बाधी ॥ निजराम पदांबुजीं रंगत त्यातें सत्य कदापि न बाधी ॥३॥

पद ३२७.
रविकुळदीपक दशरथनंदना ॥ दास-तारण अघ-निवारण विमळ वारिजनयना ॥धृ०॥
विबुध-बंध-विमोचना खर ताटिका तनु छेदना ॥ दानवारिप्रभंजनात्मज ईश सौख्यनिधाना ॥१॥
जनकनंदिनी-मन-सरोवर-राजहंस उदारा ॥ निजसुखालय अखिल रंग असंग जगदाधारा ॥२॥

पद ३२८.
विपरीत चरित गुरुचरणांबुजीं ॥ दुरित कानन त्यजुनि मुनिजन भ्रमर करिति रुंझि ॥धृ०॥
जगति तळ आणि विबुधमंडळ विरस भाविति भोग ॥ अचळ अखिळ सुखिं निरंतर रहित योग वियोग ॥१॥
कनक कामिनी गृह सुता सुत विगुतले जन जेथ ॥ इंद्रजाल समूळ मानुनि सुजन न रमति तेथ ॥२॥
सहज पूर्ण सुखीं निजीं निज नित्य निष्क्रिय रंग ॥ निर्विचार दशा अहेतुक ब्रह्मरूप अभंग ॥३॥

पद ३२९. (कळों आलि माव रे या चालीवर)
घडि घडी जीवित सरतें रे ॥ मरण कोण यापरतें रे ॥
नित्य प्रबळ हान नेणुनि फिरसी ॥ करुनियां मुख वरतें रे ॥धृ०॥
विवेक सांगे गोष्टी रे ॥ काळ लागला पाठीं रे ॥
साधुभक्त सत्‌श्रवणें रे ॥ चुकवी कोण आटाआटी रे ॥१॥
दिनकर असतां काय दिवा ॥ साक्षी असतां काय रवा ॥
अवतारादिक तेही गेले काय असावध जीवा रे ॥२॥
पाहें हित तें आधीं रे ॥ दुरी करीं भवव्याधी रे ॥
नित्य निरामय अभंग रंगुनि निजानंदसुख साधीं रे ॥३॥

पद ३३०. (चाल सदर.)
दुर्जय भव हा चुकवा रे ॥ शाश्वत निजसुख पिकवा रे ॥धृ०॥
क्षणभंगुर हा देह पाहीं ॥ येईल पुढति श्रुत नाहीं ॥
कीटक जळचर पशुपक्षी यांच्या पडणे प्रवाहीं ॥१॥
प्राचिन संचित क्रियमाणी ॥ कर्मत्रय हे त्रिवेणी ॥
सुकृतदुष्कृत वरी याची अपार भरता हे भरणी ॥२॥
पामर भुलले कीं जन हे ॥ अनुपरि नावरीच मन हें ॥
मूढ रंगेना निजसदनीं ॥ वसवि विषयांचें वन हें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP