पदसंग्रह - पदे १८६ ते १९०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद १८६.
साधुसंत हे महा मैंद जाती रे ॥ ब्रह्मारण्यीं नेउनि जीव घेती ॥धृ०॥
भोळि भाविकें देखुनि हळुच कानीं ॥ गोष्टी सांगुनि बैसविती अधिष्ठानीं ॥१॥
जीव घेउनि सोडिती लागें ॥ पाठिराखे उदंड यांचे सांगे ॥२॥
यांचें नि:संतान नव्हे कदां काळीं ॥ करिति संसाराची राखरांगोळी ॥३॥
द्दष्टीबंधन करिताति खाणोरी ॥ मोठे भोंदु मानववेषधारी ॥४॥
फांसेपारधी दिसती वरि वरि भोळे ॥ जो तो यांच्या पायांवरी कां लोळे ॥५॥
वोस पडेना कधींच पाहा यांचें ॥ निजहस्तें छेदिती शिर जिवाचें ॥६॥
निजानंदें रंगले रंगले सर्व रंगीं ॥ मेले पाठीं लागले युगायुगीं ॥७॥
पद १८७.
आत्मया रामा ये रे ये रे पूर्णकामा ॥ मुनिजनमानस-विश्रामा ॥ धांवें पावें निजसुखधामा रे ॥धृ०॥
देवा तुझिया मज विस्मरणें ॥ नाना योनी जन्ममरणें ॥ लागलें जीवपण हें धरणें रे ॥१॥
मी तों अपरादी अन्यायी ॥ किति म्हणउनि सांगों कायी ॥ तूंचिबाप तूंचि आई रे ॥२॥
दटावितां बापें बाळ ॥ माता समजावि स्नेहाळ ॥ माता मारिता बाप कृपळ रे ॥३॥
माता पिता दोन्ही पक्षिं ॥ तूंचि एक अंतरसाक्षी ॥ तरितुजविण मज कोण रक्षी रे ॥४॥
दीनदयाळ पतितपावन ॥ वेद गर्जुनि करिती स्तवन ॥ तरि त्वां कां धरिलें मौन रे ॥५॥
निजरंगा दीनोद्धरणा ॥ करिं करुणा भवभय-हरणा ॥ वारीं दुस्तर जन्म-मरणा रे ॥६॥
पद १८८.
यांत कोणाचें काय गेलें ॥ आपुलें केलें तें पावले ॥धृ०॥
येथें ऐसें तेथें तैसें ॥ पुढें होईल न कळे कैसें ॥१॥
डोळे झांकुनि अंधार करिते ॥ मार्ग सांडुनि आडमार्ग धरितो ॥२॥
विष सेवुनि पीयूष म्हणे ॥ मरण न चुके हें न जाणे ॥३॥
जैसें जन्मुनियां नग्न ॥ हिंडे दारोंदारीं श्वान ॥४॥
रंगीं रंगेना अद्यापी ॥ किती नरक भोगिल पापी ॥५॥
पद १८९.
गोविंदाची कथा गोड फार रे ॥धृ०॥
अनन्य भावें ऐकतां श्रवणीं ॥ होय जगदुद्धार रे ॥१॥
शुकमुखें श्रवण करितां परिक्षिती ॥ पाबला पैल पार रे ॥२॥
दशम एकादशीं तन्मय झाला ॥ साराचेंही सार रे ॥३॥
श्रवणमनननिदिध्यासें होय ॥ साक्षात्कार रे ॥४॥
निजानंदें रंगले ज्ञानी ॥ गर्जतिं वारंवार रे ॥५॥
पद १९०.
जनीं जनार्दन तो जनार्दन तो ॥ ब्रह्मनिष्ठ मुनिजन तो ॥धृ०॥
घटमट-भंगीं महदाकाश ॥ अभंग अद्वितिय अविनाश ॥१॥
सुगंध सुमनीं होय ॥ गुणीं गुंफितां तो नये ॥२॥
देहीं देहातीत ॥ पूर्णं रंगीं सदोदित ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP