पदसंग्रह - पदे ४७६ ते ४८०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ४७६.
अच्युत चिंतन करीं चित्ता वारुनि अहंममता ॥ ज्ञानाग्नीनें दग्ध करूनि प्राचीन संचिता ॥ध्रु०॥
ध्यात विषयांसी गुंतुनि पडसी भवपाशीं ॥ शरणागत प्रतिपाळ दयानिधि भज रे ह्रषिकेशी ॥१॥
शुक सनकांदिक रे व्याध अजामिळ वाल्मिक रे ॥ याचि उपायें तरले दुस्तर भवसिंधोदक रे ॥२॥
स्वानुभवें देखें मग तुज कायसिं दु:खें ॥ निजरंगें रंगुनियां पूर्ण विचरें सहज सुखें ॥३॥
पद ४७७. [चाल-सखया रामा विश्रांति]
ऐसें असतां परि कृतार्थ झालों जाणा ॥ करुणासिंधु चोजवला श्रीगुरु राणा ॥ध्रु०॥
घालित असतां गोंधळ या नामरुपाचा ॥ निशिदिन विषय भोगितां भ्रंश मतीचा ॥
अपूर्ण कामें दु:खित मनकायावाचा ॥ लेश न देखे स्वप्नींही स्वानुभवाचा ॥१॥
अहंममतेच्या संसर्गें मज मी नेणें ॥ नाना योनी भ्रमलों बहु श्रमलों तेणें ॥
त्रिविध तापें जर्जर मी चित्तें प्राणें ॥ अनुभव नसतां हो मिरवे शास्त्रश्रवणें ॥२॥
असेल बहुधा जन्मार्जित संचित भरणी ॥ विहिताचरणीं अर्पिलि भगवच्चरणीं ॥
त्या निज रंगें अनुताप अंत:अकरणीं ॥ उदयो झाला हो सत्ता चित्सुख तरणी ॥३॥
तम हरपलें स्वप्रकाश सहज समाधी ॥ सर्वहि झाली श्रीगुरुच्या वचनें साधी ॥ध्रु०॥
पद ४७८. [चाल सदर.]
या परमार्थें विश्वंभर विश्वीं भरला ॥ पुरोनि उरला ॥
पुरोनि उरला वो नि:शब्द शब्दें बोला ॥ध्रु०॥
मृन्मयपात्नीं मृत्तिका तंतू वसनीं ॥ तैसी वस्तु जनीं वनीं या त्निभुवनीं ॥
तरि या कार्या हे वस्तु कारण-स्थानीं ॥ ऐसें वदती त्यांतें वंदावें बहु दुरुनी ॥१॥
पुरुष विभासे स्थाणुवरि परि पुरुषाचें ॥ कारण वस्तु म्हणणें अल्पमतीचें ॥
पूर्ण न जाणें जें यथार्थपण वस्तुचें ॥ तें जाणावें अज्ञान कारण याचें ॥२॥
चित्:सुवर्णी जग नग जड अनृत विकारी ॥ स्वसंकल्पें या नामरुपासि उभारी ॥
जळमय सिंधूवरि जैशा बुद्वुदलहरी ॥ दुजें निवी हा निजरंग विजनविहारी ॥३॥
पद ४७९. [चा. सदर.]
मन हें पापी अद्यापी उपरति धरिना ॥ ब्रह्मानंदें ब्रह्मांडगेळ भरीना ॥ध्रु०॥
चंचळ मोठें कोठेंहि स्थीर न राहें ॥ व्यर्थ दिगंतापरि तीही चिंता वाहे ॥
जन्मोजन्मीं सुखदु:खें अगणित साहे ॥ फळ दुष्कृतिचें भोगिजे तितुकें लाहे ॥१॥
संशयकारी अविचारी सतत विकारी ॥ रत व्यभिचारीं अपहारित जें परनारी ॥
विषयविहारी संकल्प विकल्पें मारी ॥ बांधन मोक्षाचें केवळ हें अधिकारी ॥२॥
शंकर केला किंकर त्या मन अपवित्रें ॥ स्मशानभुवनीं लोळविलीं विष्णुगात्रें ॥
कौशिक ब्रह्मा पराशर ऐसीं पात्रें ॥ छळिलीं गिळिलीं निर्दळिलीं ईक्षणमात्रें ॥३॥
कृतार्थ मानी विषयेंद्रिय मिळणी संगें ॥ लाभालाभीं नाचवितें हर्षविषादें ॥
अविश्वासी अवमानित साधुवृंदें ॥ पूर्ण रंगीं रंगेना निजानंदें ॥४॥
पद ४८०. [चा. सदर.]
तरणोपाया भावार्थ हा मूळ पाया ॥ ईक्षणमात्रें दूर करितो सर्व अपाया ॥ध्रु०॥
भाव शब्दें आस्तिकता हाता आली ॥ तेव्हां ह्रदयीं सद्भक्ति पूर्ण उदेली ॥
नवविध भजनें भगवंतीं शरण रिघाली ॥ निजात्मबोधें समसाम्यें समरस झालीं ॥१॥
निजभक्तीचें दास्य मुक्ती करिती चारी ॥ विरक्ति आंगण झाडी होऊनियां कामारी ॥
ज्ञान उपरमलें पावुनियां परपारीं ॥ अभेद भक्ती हे भावें निरंतरीं ॥२॥
भाव धरी तया ऐसा हरि तारी ॥ भक्तांकारणें झाला दशरूपधारी ॥
दीनबंधू दयासिंधू जगदुद्धारी ॥ निजानंद रंगला सचराचरीं ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP