मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६०१ ते ६०५

पदसंग्रह - पदे ६०१ ते ६०५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६०१. [आ कृ.]
निजमूर्ति तुझीं विमळ नामें भक्तजन प्रेम वदत वदनीं ॥ सर्व कर्में हरिनाम मंत्रें बरीं शोभती निजसुखें ब्रह्मसदनीं ॥ध्रु०॥
अच्युता श्रीधरा कृष्ण दामोदरा माधवा वामना मधुसूदना ॥ हाचि जिव्हे करूं जप जिबा उद्धरुं भक्तिभावें वरूं संकर्षणा ॥१॥
अनिरुद्ध ह्रषिकेश उपेंद्र प्रद्युम्न पद्मनाभा विष्णु पुरुषोत्तमा ॥ गोविंद वैखरी गर्जतां नरहरी पळत दुरिर्ते दुरी त्रिविक्रमा ॥२॥
लक्ष्मीनारायणा अधोक्षजा वामना वासुदेवा जनार्दना केशवा ॥ पूर्णरंगा तुझें नाम राहो मुखीं हेंचि देईं मला स्मरणसेवा ॥३॥

पद ६०२.
दावीं वो पाउलें राम निजमूर्ति ॥ न वदवे मम मुखें विमळ कीर्ति ॥ध्रु०॥
पावलों बहुतरे जन्मजन्मांतरें बुडविलें भवपुरें या आवर्तीं ॥१॥
द्दष्टि पडली उपादान नेणेनियां नामरुपीं मृषामयविवर्तिं ॥२॥
अहं मम भंगर्वी निजमुखें रंगवीं देउनी सच्चिदानंदस्फूर्ति ॥३॥

पद ६०३.
अहं देही अनुभव तो आत्मघातकी ॥ विचारितां पदोपदीं महा पातकी ॥१॥
अहं ब्रह्म अनुभव तो ब्रह्मरूप रे ॥ ज्ञानाग्नि दग्ध करि सर्व पाप रे ॥२॥
दीपसंगें कर्पूराची काजळी नुरे ॥ अहंब्रह्मस्फुरण तेंही सर्वथा विरे ॥३॥
सहजीं सह्ज पूर्ण निजानंद रंगला ॥ हेत मात द्दष्टांतर्भाव भगला ॥४॥

पद ६०४.
सदय ह्रदय ते नरहरीदास ॥ जे सर्वदां विषयीं उदास ॥ध्रु०॥
जाणुनियां एकमेव सर्वभूतीं भगवद्भाव ॥ द्वैतबुद्धीं न धरिती मोहमदास ॥१॥
त्रिभुवनीं पाहतां पाहीं बैसावया ठाव नाहीं ॥ सत्संगतीं सुख मोठें वाटे अभेदास ॥२॥
रंगुनियां सहज रंगीं नि:संग जे सर्व सगीं ॥ पावले जे पूर्ण निजानंदपदास ॥३॥

पद ६०५.
हा मज द्दढ भरंवसा निगमाचार्यवचनेंकरुनी ॥ वोंडाळुनि जाईन मी त्याच्या एका नामावरुनी ॥ध्रु०॥
भक्तवत्सल भक्ताधीन दीनानाथ दीनबंधू ॥ भयकृद्धयनाशक पतितपावन करुणासिंधू ॥१॥
दुस्तर भवसागर जेणें मृगजळवत्‌ मज केला ॥ स्मरणें संकट हरितो हरि तो भक्तीचा भुकेला ॥२॥
कृष्ण विष्णु गोविंद हरि नारायण स्मरतां नामें ॥ निजरंग रंगविला माझा अवाप्तकामें रामें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP