पदसंग्रह - पदे ४५१ ते ४५५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ४५१. [चाल-अभंग.]
नामापरतें सार नाहीं ॥ भजा राघवाचे पायीं ॥ध्रु०॥
वेदं बहु केली खटपट ॥ निश्वय केला हा शेवट ॥१॥
अनंत शास्त्रांचा हा अर्थ ॥ हाचि केला निश्चितार्थ ॥२॥
पुराणेंही बहु बोलिलीं ॥ अंतीं हेचि बुद्धी केली ॥३॥
व्यास सनकादिक नारद ॥ बोले परिक्षिती प्रर्हाद ॥४॥
नामें प्राप्त निजानंद ॥ रंगातीत शुद्धबुद्ध ॥५॥
पद ४५२. [डफगाण]
दुर्जन पदोपदीं दु:ख दावी ॥ साधु पदोपदीं नीववी ॥ म्हणवुनि संगती करावी साधुचि पैं ॥ध्रु०॥
सहज गुण चंदना ॥ आणि ते दुर्गंधी हिंगणा ॥ तैसें साधु आणि दुर्जना सहज भाव ॥१॥
जिसा गुळ आणि लसुण ॥ तैसें साधु आणि दुर्जन ॥ स्वभाव तयांचा गुण बोल ठेवूं नये ॥२॥
हिंगें घाणी कशी टाकावी ॥ गुळें गोडी कशी सोडावी ॥ म्हणवुनि स्वभावेंचि पूर्वीं निर्माण झालें ॥३॥
सज्जना हो ह्मणतां दुर्जन ॥ सज्जना होतां नये जाण ॥ दुर्जना हो ह्मणतां सुमन ॥ त्या होतां नये ॥४॥
जैसा वायस आणि कोकिळा ॥ वर्ण एकचि दिसतो काळा ॥ परि त्या बोलतां अंतरकळा निवताती ॥५॥
किंवा तवा आणि आरसा ॥ वर्ण एकचि परियसा ॥ पाहातां वदनेंदु-प्रकाशा अंतर निवे ॥६॥
ह्मणवुनि सांडुनि निंदा स्तुतीं ॥ आदरें किजे सत्संगती ॥ तरीच निजानंदप्राप्ती सर्व रंगीं ॥७॥
पद ४५३.
श्रीगुरुराज सखा ॥ झाला पावें स्वसुखा ॥ध्रु०॥
मजला म्यां हारविलें होतें ॥ नेणिव काळ वाखा ॥१॥
आपापणा भेटविलें मातें ॥ होतां ज्ञान उखा ॥२॥
सहज पूर्ण निजरंग रंगला ॥ न वदवे सहस्रमुखा ॥३॥
पद ४५४.
कारण श्रीगुरुराजकृपा ॥ध्रु०॥
जन्म जरा मरण हे यांची ॥ हरिली सर्व त्रपा ॥१॥
निजभावें शरणागत त्यातें ॥ घालित मोक्ष प्रपा ॥२॥
निजरंगें रंगवुनि जनिं वनीं ॥ दावी चित्स्वरुपा ॥३॥
पद ४५५.
प्राणी त्यागुनि स्वात्मसुखा तो ॥ आदरें विषय विष खातो ॥ध्रु०॥
ब्रह्मारण्यविलासी भवगजमस्तक मुक्त उपेक्षी ॥ इंद्रियग्रामिचा सिंह ह्यणवुनि शुभाशुभ फळें भक्षी ॥१॥
मुक्तपणें चिन्द्रगनविहारी टाकुनि सुमन सुगंधी ॥ पंचकोशकमळीं जीव षट्पद बद्ध अविद्याबंदीं ॥२॥
दिव्य सुगंधं स्वनाभिसि असतां नकळे जीवकुरंगा ॥ सहज पूर्ण निजरंग उपे क्षुनि भुलला विषयकुरंगा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP