पदसंग्रह - पदे ३३१ ते ३३५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ३३१.
भुलले मंदमती वर्णव्यक्ती रूप लाविती परब्रह्मसी ॥ अंतरिंचि खुण नेणती तयांसि ब्रह्मप्राप्ति होय कैशी ॥धृ०॥
कलयुगीं नवलाव नाना मतें धरुनि ज्ञाते झाले घरोघरीं ॥ शब्दज्ञान कथिति चातुर्यपणें खुण न कळे अंतरीं ॥
परमार्थ विचार नेणती अणुमात्र पाखांड घेती नानापरी ॥ गोचिड क्षीरा जवळि असोनि प्राप्ति नाहीं तैसी तयांचि परी ॥१॥
एक अंत:करण ब्रह्म मानुनि म्हणती हाची मुख्य स्वानुभव ॥ मनापरतें कांहीं नाहीं ह्मणती एक मनचि ब्रह्म स्वयमेव ॥
बौद्धमते एक बुद्धी म्हणती ब्रह्म हाचि मुख्य अनुभव ॥ अंत:करणीं स्मरणबुद्धिचा निश्चयकर्ता कवण न कळे भाव ॥२॥
एक ते नादिं अनुहत ध्वनी ब्रह्म ह्मणुनि राहिले ॥ एक नेत्नीं बोटें रोवुनि पाहाती ब्रह्म म्हणती जोतिर्मय लक्षिलें ॥
एक शंखचक्र युक्त म्हणती ब्रह्म प्रत्यक्श आम्हीं पाहिलें ॥ निर्गुण निराकार म्हणती आणि तें चक्षुनें कैसें देखिलें ॥३॥
एक ते शुभ्र वर्ण ब्रह्म आहे म्हणती पाहिल्या वांचुनि न दिसे ॥ रहित वर्ण व्यक्ति म्हणुनि बोलती श्रुति तरी तें शुभ्र केवीं असे ॥
वेदां लटिके करूनि आपमतें स्थापिती तयां ब्रह्म न प्रकाशे ॥ शुभ्रचि ब्रह्म तरी तांबडें पिवळें काळें हे काय चोरचि असे ॥४॥
अचिंत्य अव्यक्त अरूप म्हणवुनि बोलती श्रुति शास्त्र वेद ॥ नादबिंदु कळा ज्योति शुभ्र वर्ण यातें जाणे ब्रह्म शुद्ध ॥
अज अव्यय निष्कळ निराभास निष्प्रपंच निजानंद ॥ सच्चिदानंद पद हेंही न साहे तेथें रंगत्वाचा कैंचा भेद ॥५॥
पद ३३२. (आम्ही नमुं त्याला या चा.)
तो निज कळेना ॥ दुरितसमूह टळेना ॥धृ०॥
चिद्ग्रंथि गळेना ॥ शोक मोह वितुळेना ॥१॥
इंद्रियवर्ग समग्रही ॥ विषयसुखा आतळेना ॥२॥
संचित सर्व जळेना ॥ निजरंग सुखें उजळेना ॥३॥
पद ३३३. (चा. सदर.)
धरावा भाव श्रीरामीं ॥ मुनिजनमनविश्रामीं ॥धृ०॥
सज्जन संग करावा ॥ षड्रिपु-समुह हरावा ॥१॥
भक्ति विरक्ति विवेकें ॥ मोक्षमार्ग विवरावा ॥२॥
मानुनि देह परावा ॥ अभंग रंग करावा ॥३॥
पद ३३४. (चा. सदर.)
तो नर पशु जाणा ॥ धरिला संसृति-घाणा ॥धृ०॥
उपेक्षुनि निजस्वरुपा ॥ झाला पात्न स्वयें विक्षेपा ॥१॥
लोकीं मीपण रुढवी ॥ परि मीपण तें त्यातें दडवी ॥२॥
सांडुनि चिन्मय-रंगा ॥ भुलला शडिवकार तनु संगा ॥३॥
पद ३३५. (चा. सदर.)
कैसा मीपणें भुललासी ॥ विषयमदें उललासी ॥धृ०॥
राम सुखाची राशी ॥ सांडुनि समूळ मूळ मिरासी ॥१॥
त्यजुनी कमलदलासी ॥ दर्दुर पंकविलासीं ॥२॥
निजरंगीं मन लावीं ॥ मग तुं रामरसायन सेवीं ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP