पदसंग्रह - पदे ५०१ ते ५०५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ५०१.
माझ्या संचितें धांव कैशी घेतली ॥ पिशुन बोलती हे श्रीहरिशीं रातली ॥ध्रु०॥
काया वाचा आणि मन, हरिचरणीं शरण लौकिकीं मात हे मातली ॥१॥
संसारासी पडलं पाणी दजें नाणीं मी साजणी जीवित्वासि तिळांजुळी दीधली ॥२॥
जळो हे लौकिक लाज सिद्धी पावलें काज निजरंगें पूर्ण दशा पातली ॥३॥
पद ५०२.
मोठे काम क्रोध लोभ तिघे पुंड रे ॥ यांनीं नागविलें साधकां उदंड रे ॥ध्रु०॥
ब्रह्मपुरीची वाट चालों नेदिती थोट ॥ हटयोगें नावरती लंड रे ॥१॥
पातेजोनि धरूं मारूं गुरुभजेंन वश्य करुं ॥ आतां यांचें चालों नेदों बंड रे ॥२॥
पूर्ण कामीं काम हरूं कल्पनेसी क्रोध करूं ॥ लोभ धरूं स्वहितीं प्रचंड रे ॥३॥
दैवी संपत्तिच्या दळें ज्ञानाग्नी यंत्र बळें ॥ असुरांचें करूं खंड खंड रे ॥४॥
निजानंदें रंगती भेदाभेद भंगती ॥ तरीच पावतील हे दंड रे ॥५॥
पद ५०३.
काम क्रोध लोभ तिघे चोर रे ॥ महापातकी घातकी थोर रे ॥ध्रु०॥
मोक्ष पंथ हा कदापि चालों नेदिती पापी ॥ निर्दय निर्लज्ज दुराचार रे ॥१॥
योग याग साधनें करितां तपोधनें ॥ नागविती त्यांसी दुर्निवार रे ॥२॥
घालुनियां आशापाश करीति जीवितासि नाश ॥ पावों नेदिति पैलपार रे ॥३॥
उपरतिनें विपरितार्थ करिल श्रीगुरु समर्थ ॥ तरि हा सार संसार रे ॥४॥
पूर्व संग भंगतां निजानंदें रंगतां ॥ सहज पूर्ण नित्य निर्विकार रे ॥५॥
पद ५०४.
ती आलि वो कृष्णा माउली ॥ आमुची कामघेनु गाउली ॥ निज विश्रांतीची सावुली ॥ध्रु०॥
पूर्ण ब्रह्म मूर्ती सांवळी ॥ जिच्या गर्जति श्रुती ब्रिदावळी ॥ जे गोकुळीं गोधनें वळी ॥१॥
सर्व बळियांमाजी जे बळी ॥ जीनें पाताळीं घातला बळी ॥ उभी यमुनेच्या पाबळीं ॥२॥
सदाशिव करी नमो नमो जीला ॥ जीचा गुणगण नव जाय मोजिला ॥ जीनें प्रेमपान्हा पाजीला ॥३॥
जे विद्वज्जनमनरंजनीं ॥ जे दु:खदारिद्रभंजनीं ॥ जीचें वास्तव्य निरंजनीं ॥४॥
ऐसें बोलतां याज्ञसेनी ॥ उडी पातली द्वारकेहुनी ॥ निजानंदें रंगली जनीं वनीं ॥५॥
पद ५०५.
मला गोकुळीं गोपाळ भेटला ॥ सोनियाचा सुदीन वाटला ॥
जनीं वनीं श्रीहरी दाटला ॥ हा दुस्तर भवसिंधु आटला ॥ध्रु०॥
आजि धन्य धन्य धन्य धन्य मी ॥ हरीविणें न देखे अन्य मी ॥
तेणें जाहलें सर्वमान्य मी ॥ पूर्वीं आचरलों कोण पुण्य मी ॥१॥
हाता आले श्री हरिपाय हो ॥ जोडला हा तरणोपाय हो ॥
सुख ब्रह्मांडीं न समाय हो ॥ आतां भवभय बापुडें काय हो ॥२॥
आतां कवणांचा नव्हे पांगला ॥ देहबुद्धिचा संग भंगला ॥
लाभला भला हो चांगला ॥ सहजपूर्ण निजानंद रंगला ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP