मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३४१ ते ३४५

पदसंग्रह - पदे ३४१ ते ३४५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३४१.  (अभंग)
काय करावें हो रुपाचें सौंदर्य ॥ निजसुख ऐश्वर्य जेथें नाहीं ॥१॥
काय करावीं हो सुवर्ण-लेणीं नाणीं ॥ नाहीं रामवाणी उच्चाराची ॥२॥
काय करावि हो शास्त्राचि व्युत्पत्ती ॥ अंतरीं विश्रांति जंव नाहीं ॥३॥
काय करावें हो पुत्र बंधू जन ॥ न लागतां क्षण पालटती ॥४॥
काय करावें हो नाना उपभोग ॥ पोटीं क्षयरोग लगलासे ॥५॥
काय करावें हो सांगिताचें गीत ॥ नाहीं हिताहित-विवंचना ॥६॥
काय करावें हो नाना छंद बंद ॥ नाहीं निजानंद सर्व रंगीं ॥७॥

पद ३४२. (अभंग)
लौकिकाचें काज नाहीं ठेली लाज ॥ गुरुकृपें निज सांपडलें ॥१॥
सर्व भावें त्याची आवडली सेवा ॥ जिवाचीया जीवा न विसंबें ॥२॥
काय सांगों गोष्टी चोज वाटे पोटीं ॥ धन्य हातवटी हाता आली ॥३॥
मी माझा अर्थ जोडिला यथार्थ ॥ जगीं जगन्नाथ दुजे नाहीं ॥४॥
हाही हा निर्धार झालासे साचार ॥ विचारीं विचार मावळला ॥५॥
सुखाचा सोहळा चोजवेना मला ॥ अधिष्ठानीं डोळा शेजे आला ॥६॥
ब्रह्म सहज पूर्ण एक निजानंद ॥ रंगला नि:शब्द श्रुतिवाक्यें ॥७॥

पद ३४३. (अभंग)
राम निजमूर्ति हाचि पैं उच्चार ॥ मंत्र षडक्षर कुळीं ॥१॥
याहुनि उपाय थोर मानूं जेव्हां ॥ झडेल पैं जिव्हा तत्‌क्षणीं ॥२॥
ब्रह्मा येऊनि सांगे याहुनि उपाय थोर ॥ चळेल साचार ऐसें जाणो ॥३॥
हाचि जिव्हे जप लिखिति मुद्रा हेची ॥ तिघांहि बंधूंची प्रतिज्ञा हे ॥४॥
स्वामी निजानंद पूर्ण आमुचा धनी ॥ रंगुनि त्याचे चरणीं निर्भय असों ॥५॥

पद ३४४. (कलयुगीं घरोघरीं संत झाले फार या चालीवर)
निजमुळा जावें गे हेंचि पडो ठावें ॥ मागिल चाळे सांडिं बाळे सावध होउनि भावें ॥धृ०॥
ऊर्ध्वपंथें चाल बाई ब्रह्मगिरी पाहूं ॥ देहभावा विलय जेथें तोचि होउनि राहूं ॥१॥
नीटे वाटे चाल बाई चोर बहुसाल ॥ जाइल टका उडेला फका लोक लावितिल बोल ॥२॥
कल्पनेच्या सैरवाटे श्वापदंच्या हारी ॥ कंटकाची पिडा मोठी शिणवितील भारी ॥३॥
दुर्जनाची रांड होका काय धोका त्याचा ॥ अपुल्या हिता सावध होतां काया मनें वाचा ॥४॥
सज्जनाचे धरी पाय तरिच लागे सोय ॥ सहज पूर्ण निजानंद एक रंग होय ॥५॥

पद ३४५. (चा. यांत कांहीं नाहीं)
जखडि घालि निकी पडों नेदि चुकी ॥ न मोडितां माज होसि जगाचिये लेकी ॥धृ०॥
वडिल बाई लावि सोयी याचि खेळें खेळा ॥ अहंमती नाचसि किति कोणे देशिचा मोळा ॥१॥
सभेकडे पाहासि काय माय तुज व्याली ॥ अवयवीं निरवावी द्दष्टि घालि खोलीं ॥२॥
देहुडें पाउल हेंचि उणें हांसति पीसूणें ॥ ऐक्य परत्र गेलें धिग्‌ जिणें लाजिरवाणें ॥३॥
मनगटाचि कळा मोठि दाहाहि बोटिं फांके ॥ डोळा लवतां ठायिंचे ठायिं लिला कैसी झांके ॥४॥
सख्या वेश्या नाचति कशा तेचि परि पाहीं ॥ जाणिव नेणिव सांडिं तुळा मुखरणिची दाही ॥५॥
नलगे त्याग भोग अंग अनंगाचे गांवीं ॥ आपुले दाटी सर्व अटी शून्य रूप नांवीं ॥६॥
मृदंगाच्या रंग संगें अंतरंगें डोले ॥ सहज सुखें विजयि मुखें निजानंदें डोले ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP