मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १४१ ते १४५

पदसंग्रह - पदे १४१ ते १४५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १४१.
आह्मी सद्नुरुकृपें सुखरुप ॥धृ०॥
स्वात्मसुखामृतसिंधु निजांगें ॥ झालों अव्यय अमूप ॥१॥
द्दश्य भाग जग नामरुपात्मक ॥ कांसविचें जैसें तूप ॥२॥
निजानंदें रंगुनि ठेलों ॥ चिन्मय-पदिंचे भूप ॥३॥

पद १४२.
ऐसें यमधर्मापाशीं यमदूत निवेदन करिती ॥ ह्मणती परिसा प्रभुवर्या नामें जड जिव उद्धरती ॥
नवविध भजन करित हरिचे हरिजन भूमंडळीं फिरती ॥ स्मरणें श्रवणें महा पापें पर्वत हो कां संहरती ॥धृ०॥
आमुचा प्रवेश ते ठायीं होतां महा संकट पडतें ॥ नरहरिस्मरण श्रवण घडतां मन हें हरिस्वरुपीं जडतें ॥
तेव्हां तुमचे सेवचें कार्य समुळीं ए समयीं बुडतें ॥१॥
ठायीं ठायीं हरिभक्त नवविध भक्तीच्या भजनीं ॥ मृदंग टाळाच्या छंदें गाती नाचती कीर्तनीं ॥
दिंडया पताका पाहातां आनंद कोंदे त्रिभुवनीं ॥ सुरवर येती पाहावया तेथें बैसुनि विमानीं ॥२॥
हरिनामाची विवंचना ऐसी करितां यमदूत ॥ किटकी-भृकुटिच्या न्यायें हरिरूप होउनिया त्वरीत ॥
बैसोनि गेले विमानीं चोज मानुनि अद्भुत ॥ निजानंदें रंगुनियां सुरगण शरण तयां जात ॥३॥
ह्मणती परिसा हरिजन हो आह्मासि टाकुनि तुह्मी जातां ॥ आमुचि गती केव्हां सांगा येरू ह्मणती हरि भजतां ॥धृ०॥

पद १४३.
लागुनि शिवभजनीं शिवभजनीं ॥ नमिन मी शिव दिनरजनीं ॥धृ०॥
हा दुर्विषय वमनवत भावुं ॥ ध्वज हा शिवभजनाचा लावुं ॥१॥
सांब सदाशिव भजन समेळीं ॥ आसुरी संपत्ती बुडविन समुळीं ॥२॥
स्थावर जंगम शिवमय पाहूं ॥ निजानंदें रंगुनि राहूं ॥३॥

पद १४४.
जगन्माता तुझी कांता ॥ रामा जनकनंदिनी सीता पतिव्रता ॥धृ०॥
आदि महंमाया चिच्छक्ती ॥ जीच्या चरणीं रुळती चार्‍हि मुक्ती ॥
दशकंठधरें ते नेली ॥ हे तो मायिक बोली ॥ हरिहरां वंद्य निंद्य कैसी ते चित्सत्ता ॥१॥
जिच्या कोपाची भृकुटी ॥ रणा आणी सकळही सृष्टी ॥
अगम्य स्थान मान न कळेचि महिमान ॥ इत्यंभूत रूप जिचें नकळे तत्वता ॥२॥
रावणाची काय तेथें मात ॥ दशवदनें वीस हात ॥ खंड विखंड गात्नें ॥
करिती इच्छामात्रें ॥ परि हें अवतारचरित्र दर्शविलें पाहातां ॥३॥
अनंत ब्रह्मांडें घडी मोडी ॥ जेथें अवताराच्या होती जाती कोडी ॥
ब्रह्म तेचि माया ऐके रामराया ॥ माया तेंचि ब्रह्म रज्जु सर्प भासे भ्रांता ॥४॥
जगदंबा हे निजरंगें ॥ पुण्यपापातीत निजांगें ॥ ऐसीं भरताचीं वचनें ॥
रामें राजिवनयनें ॥ ऐकोनी म्हणें बापा परिसं हे दुर्वाता ॥५॥
मिही जाणें याप्रमाणें ॥ परि हे त्रिगुणात्मक जन याचि गुणें ॥धृ०॥

पद १४५.
मानसपूजन याचि रिती धन्य सच्छिष्य करिती ॥ सद्नुरु श्रीरंग निजमूर्ति ज्याची अगाध कीर्ति ॥धृ०॥
प्रथम श्री लद्नुरुचें ध्यान आवाहन अधिष्ठान ॥ चित्त चतुष्टय आसन अर्घ्य पाद्य जाण ॥१॥
दिव्य सुगंध स्नेहें मज्जन सत्वजीवनें स्नान ॥ दिव्य वस्त्रें करुनी परिधान दिव्य भूषणें पूर्ण ॥२॥
भव्य दिव्य सुगंध चंदन दिव्य अक्षता सुमन ॥ अहं सोहं धूप जाळोनि ब्रह्मीं ब्रह्मार्पण ॥३॥
एकारती दिव्य तेजें उजळुनि दिव्य सुरस पव्कान्न ॥ नैवेद्य परिपूर्ण अर्पूनि स्वात्मवेदन ॥४॥
पावतां शेष प्रसाद सच्छिष्य भेदीं अभेद दास्य ॥ तांबूल सुरंग सविशेष तोचि स्वयंप्रकाश ॥५॥
दिव्य छत्रें चामरें दर्पण शिखिपत्न व्यजन ॥ प्रदक्षणा साष्टांगें नमन पुजन संपूर्ण ॥६॥
ऐसें हें मानस पूजन करितां संतसज्जन ॥ पूर्ण निजानंदें रंगोनि ब्रह्मसंपन्न ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP