मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४३६ ते ४४०

पदसंग्रह - पदे ४३६ ते ४४०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४३६.
पंडित हो येथुनि तुमचें झालें ॥ चित्रगुप्तीं पत्र पाठवुनि दिलें ॥
कानीं सांगों आलें यमें बोलाविलें ॥ काळे होते ते पांढरे झाले ॥धृ०॥
आतां जड जुड वाटे लावा ॥ दांत कान डोळे पुढें पाठवा ॥
घरीं अडखीळ घालुनि ठेवा ॥ बहुत जड आलें तुमच्या जिवा ॥१॥
आतां सांडा मागील छंद ॥ वाचें स्मरा राम गोविंद ॥
तेणें चुकेल भवबंध ॥ रंगीं रंगेल निजानंद ॥२॥

पद ४३७.
जीवाचा जीवन आणा साजणी गोविंदराणा ॥ अन्यथा व्याकुळ प्राणप्रयाण वो सत्य जाण वो ॥१॥
करी जो गोपालकाला वेणुनादीं वो ॥ चित्त वेधी वो ॥२॥
लागला तयाचा छंद भेटला आनंदकंद ॥ स्वामी हा निजानंद सर्व रंगीम रंगला ॥ शोक हा भंगला ॥३॥

पद ४३८.
भविष्य वोलतों मी अवघा लोक मरेल ॥ सद्नरुसी शरण जातां जन्ममरण चुकेल ॥धृ०॥
नवद्वार नगरींचा जीवरावें मरेल ॥ त्याचिये संगतीचे लोक बेहु नाडतील ॥
उर पोट घेउनियां दु:खें बहु रडतील ॥ दुश्चिन्हें उदेलीं हो ऐका तेंचि सांगिजेल ॥१॥
हात पाय मान कांपे तोचि भूकंप जाण ॥ लांब दाढी शुभ्र झाली धूमकेतु हे खूण ॥
दंतपंक्ती पडली हो उल्कापात संपूर्ण ॥ पांढरी झाली शेंडी शेंडेंनक्षत्र आपण ॥२॥
दुश्चिन्हें देखुनि ऐसीं संतीं शांतीं मांडिली ॥ रजतमविकार-काष्ठें एके ठायीं मेळविलीं ॥
मनबुद्धि-कुंडामाजीं ज्ञानाग्निनें जाळिलीं ॥ वरी अज्ञान घृतधारा त्यांत अविद्या मोहिली ॥३॥
दुश्चिन्हें देखुनि ऐसीं संतीं मार्ग दाविला ॥ त्याचि मार्गें आम्हीं जातों कोणी याल तरी चला ॥
सत्संग गेलिया मग उपाव बुडाला ॥ निजानंद पायीं रंगों विघ्न कैंचें अम्हांला ॥४॥

पद ४३९.
बाई ये मना कैसें वो मानलें ॥ तें तूं आम्हां सांगें वो वहिलें ॥धृ०॥
ध्येय ध्यातां नये ध्याना ॥ तें कैसें मानलें मना ॥
अलक्षतें लक्षासि कैसें आलें ॥ सगुणनिर्गुण कैसें निवडलें ॥१॥
लक्षितां विश्चाच्या ठायीं ॥ स्वयेंचि संचलें पाहीं ॥
सगुणनिर्गुण हें तेथें उरलें नाहीं ॥ मींपण समूळ बुडालें जये ठायीं ॥२॥
बाई ये मना ऐसें वो मानलें ॥धृ०॥
मन तया पाहुं गेलें ॥ मनही तेंचि झालें ॥ मनाचें मनपणही मावळलें ॥
कर्पूर अग्नीसंगें तैसें मना झालें ॥३॥
गुळाचि गोडी जैसी न सांगवे मुकियासी ॥ अंतरींच तृप्त होय जैसें अनुभवें अनुभवी जाणती ते आपैसें ॥४॥
जें जें द्दश्य पाहों जाय ॥ तें तें निजानंद होय ॥
द्दश्य दर्शनीं समूळ लया जाय ॥ सहज पूर्ण रंग ब्रह्मांडीं न माय ॥५॥

पद ४४०. [चा. दिंडी]
एक भावें शरण तया जावें ॥ श्रीसद्नुरुचें वाहन घर व्हावें ॥धृ०॥
नमूं विनायक निजानंद राजा ॥ जया नायक आंत नाहीं दुजा ॥
तया साष्टांग प्रणिपात माझा ॥ देहीं देहभाव समर्पुनि वोजा ॥१॥
निजानंद शारदा मूळ माता ॥ तये चरणीं ठेविला द्दढ माथा ॥
मतिप्रकाश पूर्ण होय ध्यातां ॥ धणी न पुरे गुण गीतीं गातां ॥२॥
परब्रह्म निर्गुण निर्विकार ॥ अज अव्यय अपार निराधार ॥
तेंचि सद्रुरुरूप साकार ॥ गुणी गुणातीत निजनिर्विकार ॥३॥
निराकार गुरुरूपें आकारलें ॥ जैसें सुवर्ण मूर्तिमंत झालें ॥
गाररूपें जळचि संचलें ॥ किंवा तंतु पटत्वासि आलें ॥४॥
तो नृपती होउनि विश्वापाळू ॥ आत्मबोधें हें सर्व सुखें जाळु ॥
करु कर्मे अथवा सर्व गाळू ॥ परी तो निष्ठुर ना कृपाळू ॥५॥
गृहाश्रमी अथवा नग्न मौनी ॥ भाग्यवंत दरिद्री दिसो जनीं ॥
परी तो संकल्प शून्य मोक्षदानीं ॥ त्यांचा महिमा अपार कोण वानी ॥६॥
भोग भोगित असतां नव्हे भोगी ॥ सर्व त्यागी दिसतां नव्हे त्यागी ॥
त्याग  भोग प्राचीन देहालागीं ॥ महाराज तो पूर्ण ब्रह्मयोगी ॥७॥
दिसे चालतां सर्वत्र पायीं ॥ भ्रमण चक्रीं मक्षिका अचळ ठायीं ॥
अधिष्ठानीं बैसला ढळत नाहीं ॥ अचळ अढळ नित्य सर्वदांही ॥८॥
परपीडा देखुनि चळीं कांपे ॥ परोपकारीं परम सौख्यरूपें ॥
निंदा नामें अत्यंत म्हणे पापें ॥ दीनानाथ दीन बंधु मायबापें ॥९॥
ऐसे गुणी अनंत सद्रुरू ॥ मुखें एका मीं स्तुती काय करूं ॥
सहस्रमुखें स्तवितां नेणे पारू ॥ लीलाविग्रही प्रत्यक्ष दिनोद्धांरू ॥१०॥
सत्य सर्वदा राहिलें वाचें ॥ अभेद अकृत्रिम तो सांचे ॥
नाम न साहे जो कुमार्गाचें ॥ नित्य नाम मुखें गाईन मी त्याचें ॥११॥
ऐसा अनुभव त्या गुरु म्हणावें ॥ नाहीं तरी रुवरी बिंदुलें द्यावें ॥
घरांकुरा योग्य तो स्वभावें ॥ वेदबाह्म तो तुम्हांसि असो ठावें ॥१२॥
भीड कायसी मतवादियांची ॥ जयां वेद करीत छी छी ॥धृ०॥
संतसज्जन म्हणती बोधराया ॥ आजि निववीलें पूर्ण सखया ॥
आलिंगीलें सहस्र करुनि बाह्मा ॥ निजबोध निरसिली पूर्ण माया ॥१३॥
आजि आनंदानंद मोठा झाला ॥ आत्माराम प्रत्यया पूर्ण आला ॥धृ०॥
संतलक्षणें रंगला निजानंद ॥ देहीं बोलतां दिसे द्वैतबाध ॥
सहज पूर्ण परब्रह्म स्वत: सिद्ध ॥ जगदुद्धारी महाराज शुद्ध बुद्ध ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP