पदसंग्रह - पदे ६२६ ते ६३०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ६२६.
विठोबा मागेन हा वर देईं रे ॥ आणिक न मागे कांहीं रे ॥ध्रु०॥
तृणवत् त्रिभुवनिंचेंही वैभव नलगे मुक्ति आम्हांसी रे ॥ भजन भाग्य हें सगुणीं जोडे मोक्ष उभा त्यापाशीं रे ॥१॥
सुकृतहीनें अति दीनें जीं अज्ञानें केवळ मूढें रे ॥ दर्शनमात्रें मोक्ष तयांसी द्यावा गरुडारूढें रे ॥२॥
भूवैकुंठ करावें येथें दीनानाथें आतां रे ॥ सहज पूर्ण निजरंगा तूं नि:संगा रुक्मिणिकांता रे ॥३॥
पद ६२७.
गुरु निर्मळा गुरु निष्कळा सकळ कळातीत तुझी आकळ लीला रे ॥ध्रु०॥
परब्रह्म पुतळा येउनियां भूतळा प्रबोधुनि खळा नेसी निज मूळा रे ॥१॥
अमळ चरण कमळदळामाजि अमृत भ्रमरकुळा सेवितां होय सुखसोहळा रे ॥२॥
रत्नावरि कीळा कर्पूर परिमळा ॥ निज रंगें रंग जैसी गोडि गुळा रे ॥३॥
पद ६२८.
हा विसरों कसा ह्रषिकेशी ॥ व्याप्य व्यापक ह्रदयनिवासी ॥ध्रु०॥
मन बुद्धि चित्त अहंता ॥ यांचा द्योतक सर्व नियंता ॥१॥
स्मरण विस्मरण दोहिंचा साक्षी ॥ यासि विसरोनि कोण उपेक्षी ॥२॥
सहज पूर्ण अभंग रंग ॥ निजानंद नित्य नि:संग ॥३॥
पद ६२९.
कोण्ही वंदुं कोण्ही निंदुं ॥ भावें भजावा गोविंदु ॥ध्रु०॥
नंदानंदन मुकुंदु ॥ मना लागो त्याचा छंदु ॥१॥
निर्विकल्पतरुचा कंदु ॥ यासी नेणति ते बुद्धिमंदु ॥२॥
सत्य शास्वत नित्य निर्द्वंद्वु ॥ रंगीं रंगला निजानंदु ॥३॥
पद ६३०.
निजानंदें विचरों स्वच्छंदें निर्द्वंद्वें ॥ध्रु०॥
ब्रह्मपुरींचे ब्राह्मण आह्मी ब्रह्मरूप वर्णाश्रमधर्मीं ॥ नित्य मुक्त या कर्माकर्मीं नातळती षडूर्मीं ॥१॥
अवाप्तकामीं निजसुखधामीं निजभजनाची भिक्षा मागों ॥ संचित सरलें ह्मणवुनि आलों संतांपाशीं सांगों ॥२॥
सदां शुचिष्मंत संत स्वस्वरूपीं शुद्ध बुद्ध ॥ सहज पूर्ण निजरंग रंगला जनिं वनीं प्रसिद्ध ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP