पदसंग्रह - पदे ७१ ते ८०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ७१. (बोलणें फोल झालें या चा.)
दुर्लभतर हो दर्शन या महा-पुरुषांचें देवांसही ॥धृ०॥
प्रपंचविषयीं सदां सुप्त ॥ निजानंदें नित्य तृप्त ॥
न कळे अगणित पुण्य गुप्त ॥ ज्यांच्या पद-रज-स्पर्शाचें ॥१॥
दैवी संपत्तिचें निजधाम ॥ अखंड स्वरुपीं पूर्ण-काम ॥
स्वप्नीं नायकती दुर्नाम ॥ सहसा अनृत अस्पर्शाचें ॥२॥
नसतां आदि मध्य अवसान ॥ अधिष्ठानीं जगद्भान ॥
पाहाती विवर्त उपादान ॥ कीं प्रतिबिंब आदर्शाचें ॥३॥
सहजीं सहज पूर्ण निजरंग ॥ अज अविनाशी अव्यय अभंग ॥
सेविति परमामृत निजरंग ॥ जें महाकारण हर्षाचें ॥४॥
पद ७२.
काय त्यांचें झालें जन्मोनि व्यर्थ मेले ॥ पावोनि नरदेह व्यर्थ आले तैसे गेले ॥धृ०॥
भक्तिविना ज्ञान व्यर्थ ज्ञानविना कर्म ॥ निरहंकृतिविणव्यर्थ वर्णाश्रम-धर्म ॥१॥
भूतदयेविण सकळ कळा शून्य़ रे ॥ शांतिक्षमेविण व्यर्थ दान पुण्य रे ॥२॥
संत-समागमेविण व्यर्थ संगारे ॥ निजानदेविण व्यर्थ बाह्म रंग रे ॥३॥
पद ७३.
त्याची तनु काशी तनु काशी ॥ मुक्त क्षेत्ररहिवासी ॥धृ०॥
गुरुभजनीं मन उन्मन ज्याचें ॥ नवल मी सांगों काय तयाचें ॥१॥
भागीरथी तीर्थ क्षेत्र ॥ सद्नुरु-चरणीं परम पवित्र ॥२॥
विश्वेश्वर तो सद्नुरु अभंग ॥ सहजीं सहज पूर्ण निज-रंग ॥३॥
पद ७४.
हो कां उत्तम ते उत्तम ते ॥ न तुकती गुरु-पदसम ते ॥धृ०॥
अकल्प तपें तपती ॥ नाना मंत्र-बिजें जप जपती ॥१॥
विद्या कला संगित नाना ॥ केलें गायन सुरस तनाना ॥२॥
निज-सुख-रंगें न रंगती ॥ जर्हीब्रह्मादिक सुरपती ॥३॥
पद ७५. (दत्तात्रय दत्तात्रय ऐसें या चा.)
सर परता गोपाळा करुनी ह्मणावीसि अकर्ता ॥
तुझें तुजचि साजे अवघी तुझीच हे सत्ता ॥धृ०॥
आत्मानात्म-विवेकें विवरुनि पाहातां जनार्दना ॥ एकमेवा ह्मणतां मान देसी श्रुति-वचना ॥
जड जिव आम्हासि करुनी दु:खे भोगविसी नाना ॥ तरि हें कवणें केलें याची कैसी विवंचना ॥१॥
सहस्रांश राईचा त्याहीमध्यें व्यापक तूं ॥ ओतप्रोत जग-पटीं अवघा एकचि तंतू ॥
मनबुद्धीचा चाळक अवघा तूंचि परंतु ॥ आह्मांसी भवबंधन कां आम्हीं दिनरजनीं चिंतूं ॥२॥
कांहिंच नसतां मुळीं बद्धमोक्षाची वार्ता ॥ व्यर्थचि संशयीं न पडों आह्मी नहों ते आतां ॥
नभीं निळिमा नैसी तैसी स्वरुपिं अहं-ममता ॥ निजरंगें अनुभविलें तुज म्यां अच्यूतानंता ॥३॥
पद ७६. आरती सप्रेम या चालीवर.
जा जा रे भ्रांत हो प्रांत केला हा कैसा ॥
कोश-कटिक-न्यायें दाटुनि आणिली जीवदशा ॥धृ०॥
प्रकृतिपर परमात्मा आनंदघन मी अविनाशी ॥ सच्चित्सुखमय गुणी गुणातित अव्यय सुखराशी ॥
अचळ अमळ पर पूरित निष्कळ अद्वय पदवासी ॥ त्या माझ्या विस्मरणें तुम्ही झालां माहादोषी ॥१॥
रजत शुक्तिका रज्जू सर्प स्थाणूवरि चोर ॥ विवर्त उपादानीं अवघा मायिक व्यवहार ॥
स्वर्ग नरक चित्स्वरूपीं कैंचा लटिका संसार ॥ कवळद्दष्टी पीतवर्ण भासे सकळ चराचर ॥२॥
हेमीं नग तंतुवरि पट घट ह्मणती मृद्भांड ॥ कारण उपादानीं तैसें पिंड ब्रह्मांड ॥
स्मरणीं अंतर पडतां हें उद्भवलें पाषांड ॥ अहं ममतेच्या संगें जड जिव पावति यमदंड ॥३॥
हो झालें तें झालें आतां एकचि तुम्ही करा ॥ भवसागरीं सद्नुरू नावाडयाचे पाय धरा ॥
सज्जनसंगम निगमसमागम करुनीयां विवरा ॥ कोहं कथमिदं जातं ऐसें विचारा ॥४॥
वेदविहित सत्कर्माचरणें हरि-गुरुचरण स्मरणें ॥ निरहंकृति निष्काम नवविध भजनें भव हरणें ॥
ब्रह्मीं ब्रह्मार्पण बुद्धीनें जनन मरण हरणें ॥ निजानंदें निर्द्वंद्वें हा पूर्णरंग भरणें ॥५॥
पद ७७. (वारी संकट हरि दामाजीचें या चा.)
आला क्षिरसागरवासी आला वो गिरिधारी ॥धृ०॥
करुणाकर रुविमणिवर दीनबंधू ॥ भयकृद्भय हारी ॥ शरणागत वत्सल मायासिंधू ॥ पर पार उतारी ॥
धरुनी अवतार सगुण निजांगें ॥ पावला लाग वेगें ॥ रवितनवा पुलिन विहारी ॥१॥
एका अंबरिषासाठीं जेणें ॥ द्ष्णविध रूप धरणें ॥ धर्नसंरक्षण समुळीं करणें ॥ म्हणउनि अवतरणें ॥
पाहातां स्वानुभवें परतर ब्रह्म ॥ अज अव्यय निज निष्काम ॥ जो म्हणवितसे कंसारी ॥२॥
नानासंकटीं जो संरक्षी ॥ सहसा नुपेक्षी ॥ आमुचा सर्वस्वें तो कै पक्षी ॥ सर्वांतर साक्षी ॥
निजरगें रंगुनि रंगातीत ॥ होउनियां मूर्तिमंत ॥ गोकुळीं गाई चारी ॥३॥
पद ७८.
त्रिगुणात्मक जन रे ल्याले अज्ञानांजने रे ॥धृ०॥
एकीं अनेक विलोकित द्दष्टी ॥ द्दश्य मृषामय वेष्टि समेष्टी ॥१॥
दर्पणिचें धन तद्वत डोळां ॥ भासत स्थिर-चर जन-पायाळा ॥२॥
रज-तम-मिश्रित रग विरंग ॥ जीवनिं निरखित विश्वतरंग ॥३॥
पद ७९.
आह्मीं नायकों या कर्णीं ॥ जगनग चित्सुवर्णां ॥धृ०॥
स्वरुपीं प्रपंच झाला होता ॥ सगळी लटकिच हे दुर्वार्ता ॥१॥
सुवर्ण सुवर्णपणा उणें ॥ काय झालें होतां लेणें ॥२॥
पूर्ण रंगीं नानारंग ॥ श्रवणीं सुवर्णाचे भुजंग ॥३॥
पद ८०.
तो हरि आणावो ॥ यादवराणा वो ॥धृ०॥
करुणाकर हरि गिरिवरधारी ॥ रुक्मिणिरमण मुरारी ॥
देवकिनंदन कंस-निकंदन स्वभक्त जनकै वारी ॥१॥
सज्जन-रंजन भव-भंजन रिपुगजन विजन विहारी ॥
गरुड वहन मनमोहन चतुर्भुज चक्र-गदांबुजधारी ॥२॥
सचिद्धन श्रुतिसार परात्पर ॥ अज अव्यय अविकारी ॥
निगमागम शम-दम-यम-नियमें प्राप्त कदापि न शौरी ॥३॥
सनकसनंदन नारद मुनिजन वंदिती पदरज भाळीं ॥
सुरवर मोचन राजिवलोचन मधसूदन वनमाळी ॥४॥
जग नग कनक जनक जो विधिचा निर्विकल्प नि:संग ॥
गोकुळपाळक त्रिभुवनचाळक सहज पूर्ण निजरंग ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP