पदसंग्रह - पदे २०१ ते २०५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद २०१.
मन पाहिलें विषयी मुमुक्षु किंवा मुक्त ॥धृ०॥
तनु धन सुत दारा सत्य ॥ मानुनि जें करितें नृत्य ॥ होउनि अत्यंत विषयासक्त ॥१॥
पश्वात्तापा आलें ॥ वांतीचे परि झालें ॥ इहामुत्न फळ भोगी विरक्त ॥२॥
पूर्ण रंगें बोलतें ॥ निजानंदें डोलतें ॥ निरसुनियां दोन्हीं व्यक्ताव्यक्त ॥३॥
पद २०२.
मुख पाहुं नये त्या शवाचें ॥ वाचे नाम नये केशवाचें ॥धृ०॥
श्रीहरिगुरु-भजन घडेना ॥ भ्रमद्वार कदां उघडेना ॥१॥
काया वाचा आणिक मन तो ॥ नित्य विषयीं समर्पण करितो ॥२॥
पूर्ण निजरंगें रंगेना ॥ अहं-ममता तंव भंगेना ॥३॥
पद २०३.
अद्यापी त्रास मनीं येईना ॥धृ०॥
विषय वमनवत् सेवीलें सेविता ॥ परमामृत घेईना ॥१॥
नाना योनी दु:खें अनेक भोगितां ॥ पश्वात्ताप होईना ॥१॥
सहज पूर्ण रंग निजानंद नि:संग ॥ शरण तया जाईना ॥३॥
पद २०४.
रामनामामृतपान भूलोकीं ॥ करि तो धरामरें नयनीं विलोकीं ॥१॥
तोचि जीवन्मुक्त भक्त भला रे ॥ रामस्मरणीं राम तो लाभला रे ॥२॥
देव भक्त कोण्ही भिन्न ह्मणे दोन्ही ॥ पाहों जातां दीपचि तो वन्ही ॥३॥
रामस्मरण करी नित्य निरंतरीं ॥ राम रमावर सबाह्म अंतरीं ॥४॥
राम निजानंदीं रंग सागरीं तरंग ॥ ओतप्रोत रामीं राम नि:संग ॥५॥
पद २०५.
संत व्हावें तेव्हां कळतील संत ॥
ओतप्रोत आपेंआप कोंदाटले पाहु जातां लवण सिंधुच्या आंत ॥धृ०॥
मेला त्याला ज्याला पाहुन ये ह्मणता तेणें आधिं येथें जेव्हां मरावें ॥
सांगावया कवण हिरोनि आला गंगो. दकें सागरांत भरावें ॥१॥
देहीं देहातीत त्याग भोगरहित आलें गेलें नभ हें जाणावें ॥
घट मठ भंगतां नभीं नभ संचलें सगुण निर्गुण त्यांसी कवणें म्हणावें ॥२॥
हंसाची हे गति हंसचि जाणती मुक्त मुक्ताफळ सेवित जाती ॥
तो निजरंग न जाणति वायस पक्षि खरे परि हे अन जाती ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP