मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १११ ते ११५

पदसंग्रह - पदे १११ ते ११५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १११.
मन हें कारण बंधन मोक्षाचें ॥ पाहातां दोहीं पक्षाचें ॥धृ०॥
स्वरुपोन्मुख मन उन्मन होतां पूर्णानंदीं लक्षाचें ॥
विषयविलासीं गुंतुनि पडतां केवळ बीज भववृक्षाचें ॥१॥
याचिलागी करणें सह मन शम दम युक्त मुमुक्षाचें ॥
स्वात्म-सुखामृत सेवुनि तृप्त केवळ साधु सुदक्षाचे ॥२॥
स्वर्ग नर्क या द्विविध कल्पना करणें हें मन यक्षाचें ॥
निज रंगें रंगतां होतें स्वरुप पूर्ण अलक्षाचें ॥३॥

पद ११२.
साधु समागम दे मज देवा ॥ सद्नावें त्यांची करिन मी सेवा ॥धृ०॥
भाविक हरि प्रिय हरिरुप केवळ ॥ नको गा निंदक वादक ते खळ ॥१॥
दधि मधु पय घृत टाकुनियां मिन ॥ निशिदिन सेवित जीवनीं जीवन ॥२॥
तक्षक वृश्विक ते निज रंग ॥ दुरुनिच नमिले न करुनियां संग ॥३॥

पद ११३.
श्रीहरिचरण-सरोजीं भ्रमरा राहें निश्वळ रे ॥
विषयपंचक कंटकवन हें सांडुनि कुश्चळ रे ॥धृ०॥
सनक सनंदन नारद मुनिजन हरिप्रिय अळिकुळ रे ॥
नित्य निरामय परमामृत-रस सेविति परिमळ रे ॥१॥
नित्य नूतन ब्रह्मसनातन चरणकमळदळ रे ॥
भक्तकामकल्पद्रुम त्याचें विमळ युगुळ मूळ रे ॥२॥
निज रंगें रंगले सुरंग कोमल पदतळ रे ॥
परात्परतर निगम अगोचर निर्मळ सोज्वळ रे ॥३॥

पद ११४.
आणुनि दावा वो शेषशायी ॥धृ०॥
विरहें सद्धुद्धि बाळा आठवुनि गोकुळपाळा ॥
बोले सखियासीं ते वेल्हाळा साजणी बाई ॥१॥
भक्ति विराक्ति शांति ॥ क्षमा दया उपरति ॥
दावा वो दावा वो मज निजमूर्ति साजणी बाई ॥२॥
न रुचें हा उपभोग ॥ विषवत विषयत्याग ॥
अंतरीं भरला पूर्ण विराग साजणी बाई ॥३॥
परे उपरी निज मंदिरीं ॥ सुमनाचे अरुवारीं ॥
अनुभविन मीं अंमरीं श्रीहरी साजणी बाई ॥४॥
सहजें मी पूर्णानंदें ॥ निज रंगें निर्द्वंद्वें ॥
विचरें चिद्भुवनीं स्वच्छंदें साजणी बाई ॥५॥

पद ११५.
भक्त देवासी भजतां भावें झाले देवचि सहज स्वभावें ॥
घटभंगें रविबिंब अनुस्युत नलगे त्या यावें जावें जावें ॥धृ०॥
उदयास्तु दिन-रजनीं स्वप्नीं वार्ताही नेणिजे देवें ॥
चिद्रविकिरणावरि जगजळ कांहींच नाही ठावें ठावें ॥१॥
जनन मरण बद्ध मोक्ष अविद्या माया जिव शिव नांवें ॥
स्वस्वरुपीं जग भगण-समुच्चय नाहिंच केला सदेवें ॥२॥
दीपासि लावितां दीप तोहि तद्रुप प्रमेय वेदांतीं जाणावें ॥
निज रंगें जें जें रंगुनि हरिमय मानव यां न ह्मणावें न ह्मणावें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP