मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १६१ ते १६५

पदसंग्रह - पदे १६१ ते १६५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १६१.
कांहीं भय नाहीं ॥ भय नाहीं ॥ स्वस्वरूप निर्वांही ॥धृ०॥
जग नग घडे मोडे ॥ हेमी हेमचि नुसतें जोडे ॥१॥
नामरुपाचा हा आळ ॥ मिथ्या संकल्पाचा खेळ ॥२॥
सहज पूर्ण निजानंद ॥ रंगीं रंगला निर्द्वंद्व ॥३॥

पद १६२.
आलेल्यानों संसारा ॥ पुरुषार्थ करा बरा ॥
सारासार विचारा ॥ मावदेहीं ॥धृ०॥
साराचेंही सार ॥ हरिनाम-उच्चार ॥
सबाह्म साचार ॥ भाव भक्ती ॥१॥
नवविधा भगवद्भक्ती ॥ विवेक विरक्ती ॥
दया क्षमा शांति ॥ सर्वकाळ ॥२॥
वेदांतश्रवण ॥ सत्संगीं परिपूर्ण ॥
विधियुक्त क्रियमाण ॥ निरहंकृति ॥३॥
निष्काम तें जाण ॥ ब्रह्मीं ब्रह्मार्पण ॥
सायुज्य निर्वाण ॥ पदोपदीं ॥४॥
तो जीवन्मुक्त ज्ञानीं ॥ वर्तोनियां जनी ॥
अक्षयी अधिष्ठानीं ॥ सर्वकाळीं ॥५॥
जरी ऐसी लागे सोय ॥ तरीच सार्थक होय ॥
अन्यथा मृगतोय ॥ भास मात्र ॥६॥
निर्गुण नि:संग ॥ निजानंद अभंग ॥
सहज पूर्ण रंग ॥ सर्व रंगीं ॥७॥

पद १६३. (काशिराजकृत.)
देहीं विदेहत्वें विचरतो तो पूर्ण ज्ञानी ॥धृ०॥
पूर्वसंस्कारें सर्व ॥ घडतीं सत्कर्में अपूर्व ॥
त्याची फलाशा आणि गर्व ॥ कांहीं नाहीं निजांगीं ॥१॥
अवघीं स्वप्नींचीं दुश्वरणें ॥ जागृतावस्थेनें संहरणें ॥
तैशीं पूर्वसंचित भरणें ॥ झालीं प्रबोधीं मिथ्या ॥२॥
प्राक्तन देहातें संरक्षी ॥ ज्ञानी साक्षी होउनी लक्षी ॥
कांहीं अपेक्षी न उपेक्षी ॥ भोग मोक्षीं वितरागी ॥३॥
उचित वर्णाश्रम विध्युक्त ॥ करी जैसा फलासक्त ॥
सर्व विषयीं तो विरक्त ॥ जीवन्मुक्त म्हणउनियां ॥४॥
लीलाविग्रही भगवंत ॥ तैसेचि हे साधु संत ॥
ब्रह्मविद तो मूर्तिमंत ॥ ब्रह्मरूप जाणिजे ॥५॥
सहज पूर्ण निजानंदें ॥ विचरे स्वच्छदें निर्द्वंद्वें ॥
त्यातें नोळखति मतिमंदें ॥ द्दश्य द्दष्टी म्हणउनियां ॥६॥
वेदश्रुतीचें निज गुज ॥ जगदुद्धारी तो महाराज ॥
भावें श्रीरंगानुज-आत्मज ॥ शरणागत चरणा त्याच्या ॥७॥

पद १६४.
मन उन्मन तुझिये पायीं ॥ आतां कोण पडेल अपायीं ॥धृ०॥
नमितां देशिकराया ॥ येती मुक्ती दास्य कराया ॥१॥
ऐसे जाणत जाणत कां मी ॥ पडां गुंतुनि विषयकामीं ॥२॥
हा मायिक विश्वतरंग ॥ सच्चित्सागर निजरंग ॥३॥

पद १६५.
अखंड टोणपा यापरी आहे श्रीहरी ॥ हात मात कळा कुसरी मजहुनि दुरी ॥धृ०॥
चौदा विद्या चौसष्टी कळा याहुनि निराळा ॥ निजानंदें सूख सोहळा भोगी स्व लिळा ॥१॥
विद्या अविद्या या दोन्ही सख्या सांगातिणी ॥ जोडफळें जैसीं तुंबिणी ते एकपणीं ॥२॥
जावळीं हें ज्ञान अज्ञान तेथें मानापमान ॥ टोणप्यासी समसमान चैतन्यघन ॥३॥
ऐसा मी टोणपा प्रसिद्धि स्वयें शुद्ध बुद्ध ॥ संचित क्रियमाण प्रारब्ध जाहलीं दग्ध ॥४॥
द्दश्य हें द्दष्टिसी दिसेना कोण्ही पुसेना ॥ निजानंदीं रंग असेना तर्क करितां नाना ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP