मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५८१ ते ५८५

पदसंग्रह - पदे ५८१ ते ५८५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५८१.
संत दयाळु मोठे गे बाई ॥ध्रु०॥
परब्रह्म मूर्तिमंत ॥ लीलाविग्रही संत ॥ उद्धरिती जीव जंत गे ॥१॥
पाहुनियां कृपाद्दष्टीं ॥ करिती परमामृतें वृटी ॥ निजानंदें भरिती सृष्टी गे ॥२॥
त्वतमसीवाक्येंकरुनी ॥ जन्मांतरिंचां दु:खें हरुनी ॥ देती हातीं रघुवीर धरुनी गे ॥३॥
सर्वांभूतीं भूतदया ॥ सारखीच रंका राया ॥ द्वैतबुद्धि गेली विलया गे ॥४॥
सर्व संगीं ते नि:संग ॥ सहजीं सहज पूर्ण रंग ॥ निजानंद अभंग गे ॥५॥

पद ५८२.
श्रीहरिचरणीं अनन्य ते धन्य रे ॥ध्रु०॥
अनन्य ते धन्य ॥ ब्रह्मादिकांसी मान्य ॥ पाण पण्य केलें शून्य रे ॥१॥
देहबुद्धीं नव्हति विभक्त ॥ ऐक्यरूपें होती भक्त ॥ चर्मदेहीं जीवन्मुक्त रे ॥२॥
अभेद भक्तिबोधें ॥ सिद्धांत शास्त्रशोधें ॥ रंगले निजानदें रे ॥३॥

पद ५८३.
सद्नुरुच्या उपकारा माय ॥ उतराई मी होऊं काय ॥  
ह्र्दयीं धरुनि त्याचे पाय ॥ राहों सर्वदां ॥१॥
मज म्यां हरविलें होतें ॥ नव्हतें दिगंताहीपरतें ॥
सांपडलें सद्नुरुच्या हातें ॥ माझें मजपाशीं ॥२॥
परि तें मजला काय होय ॥ ऐसें झालें होतें माय ॥
देहबुद्धिनें अवघें जाय ॥ केलें तें वायां ॥३॥
अवलोकितां कृपाद्दष्टीं ॥ झाली परमामृतवृष्टी ॥
निजानंदें भरली सृष्टी ॥ समसाम्यें तेव्हां ॥४॥
अनन्य व्यतिरेकेवीण ॥ छेदभेद रहीत पूर्ण ॥
जेथें नाहीं गुणागुण ॥ तें माझें मजपाशीं ॥५॥
अज्ञानाचा आवरणभंग ॥ होतां सहज पूर्ण रंग ॥
रंगीं रंगुनियां नि:संग ॥ होउनियां ठेला ॥६॥

पद ५८४.
रामरूपीं जडली प्रीति ॥ राम-मय झाली वृत्ति ॥
अंतर्बाह्म सर्वाभूति ॥ रामचि भासे ॥१॥
अशनीं शयनीं भोजनीं पानीं ॥ गमनागमनीं जनीं वनीं ॥
रामरुप नयनीं मनीं ॥ रामचि भासे ॥२॥
जें जें द्दश्य पाहों जाय ॥ तें तें रामरूप होय ॥
पाहातें पाहणें तेंही माय ॥ रामचि भासे ॥३॥
मागें पुढें तळीं वरी ॥ रामरूप चराचरीं ॥
सबाह्माभ्यंतरीं ॥ रामचि भासे ॥४॥
दिगंताही परता राम ॥ भासे अवघा पूर्णकाम ॥
मुनिजनमनविश्रामधाम ॥ रामचि भासे ॥५॥
पाहातां राम निजमूर्ति ॥ रंगीं रंगली स्फूर्ति ॥
नेति नेति शब्दें गाती ॥ वेदश्रति सर्वदां ॥६॥

पद ५८५.
मी देह ह्मणवी जो त्यासी ॥ आत्महत्या पापरासी ॥
पदोपदीं निश्वयेंशीं ॥ घडती सर्वदां ॥१॥
अंतर्बाह्म सर्वव्यापी ॥ देहबुद्धिनें त्यासी लोपी ॥
आत्मघातकी तो पापी ॥ अवलोकूं नये ॥२॥
स्वस्वरूपविस्मरणें ॥ अज अव्यया जन्ममरणें ॥
ऐसा हा दुस्तर निस्तरणें ॥ भवसिधू कैसा ॥३॥
नाहं देही न मे देहो ॥ पूर्ण ब्रह्म तें मी पाहाहो ॥
ऐसा हा अनुभवीं राहो ॥ अनुभव सर्वदां ॥४॥
ब्रह्माहमस्मि-बोधें ॥ रंगलीया निजानंद ॥
स्वप्नींचीं जैसीं द्वंद्वें ॥ प्रबोधीं मिथ्या ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP