मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५७६ ते ५८०

पदसंग्रह - पदे ५७६ ते ५८०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५७६. [चा. सदर. ज्ञानेवावर]
ॐ नमो जय जय जी सद्नुरु ज्ञानदेवा ॥ध्रु०॥
कलीमाजीं विषयी जन ॥ बहुत जाहले अज्ञान ॥
यास्तव मूर्तिंमंत ज्ञान ॥ देवरूपें अवतरसी ॥१॥
ज्ञानदेव हीं अक्षरें ॥ अक्षरातीत परें ॥
स्मरणें तरती नर पामरें ॥ दुस्तरतर हा भवसिंधू ॥२॥
कृष्णाद्रीहुनि चिद्नंगा ॥ गीता आली हे कलियुगा ॥
पावन करावया जगा ॥ श्रवणें पठणें मुमुक्षां ॥३॥
देशभाषा प्राकृत वाणी ॥ टीका ज्ञानेश्वरी करुनी ॥
प्रबोधले भाविक ज्ञानी ॥ झाले अर्थावबोधें ॥४॥
जैसी हिर्‍याची हिरकणी ॥ द्दष्टीं न पडे दुजेपणी ॥
गीता ज्ञानेश्वरी कोणी ॥ भिन्न न म्हणावी तैसी ॥५॥
अगाध महिमा वर्णूं कैसा ॥ वेद बोले पशू म्हैसा ॥
गेले पूर्वज आणिले सहसा ॥ श्राद्धीं ब्राह्मणाचें ॥६॥
ऐसा माहाराज योगी ॥ ज्ञानदेव तूं कलयुगीं ॥
पूर्ण निजानंद रंगीं ॥ अभंग रंगें रंगसी ॥७॥

पद ५७७.
जाणावे संत केवळ ब्रह्ममूर्ति ॥ संशय न धरावा चित्तीं ॥
ब्रह्मविद ते ब्रह्मचि होती ॥ ऐसें श्रुती बोलती ॥ध्र०॥
ब्रह्मनिर्गुण निर्वीकार ॥ लीलाविग्रही साचार ॥
जैसें गोठुनियां नीर ॥ गाररुपें संचलें ॥१॥
सोनें सोनेंपणा उणें ॥ नाहीं झालें होतां उणें ॥
किंवा पट तो तंतूविणें ॥ श्रवणें कोणी ऐकिला ॥२॥
नामरूपाचा गोंधळ ॥ अवघा कल्पनेचा खेळ ॥
उदकीं तरंग कल्लोळ ॥ वाच्यारंभण मात्र तें ॥३॥
नामरूपा बोळवण ॥ आत्मप्रत्ययें आपण ॥
निजानंदीं जे संलग्न ॥ सहज पूर्ण ब्रह्म ते ॥४॥
जैसें सैंधव सिंधूसंगें ॥ तैसे रंगले निजरंगें ॥
अनुभव विद्वज्जन प्रसंगें ॥ निजप्रत्ययें जाणती ॥५॥

पद ५७८. [चाल-भुपाळी]
ऐसी रंगमूर्ति म्यां देखिली ॥ध्रु०॥
हरीचीं चरणतळें गोंमटीं ॥ सुरंग रंग दाही बोटीं ॥
दोही भागीं वर्तुळ घोटीं ॥ निळीमा शोभे साजिरी ॥१॥
पोठरीया जानु जघनी ॥ मकरस्तंभ उपमा सानी ॥
पीतां बरें सौदामिनी ॥ मंद जाहल्या चिद्योमी ॥२॥
कटीं मेखळा कटिसूत्न ॥ क्षुद्र घंटिकांचें यत्र ॥
नेती शब्दें उठती मंत्र ॥ नगमोच्चारें सर्वदां ॥३॥
नाभीं जन्मे चतुरानन ॥ जदरीं त्रिवळीं समसमान ॥
ह्रदयीं श्रीवत्सलांछन ॥ महिमा मोठी न वर्णवे ॥४॥
कंठीं श्रीतुलशी वनमाळा ॥ पदेकें एकावळीं गळां ॥
कौस्तुभतेज नभमंडळा ॥ अगणित शोभा पातली ॥५॥
बाहूमंडित वीरकंकणें ॥ शंखचक्रांकित भूषणें ॥
अनुपम मुद्रिकांचें लेणें ॥ दशांगुलीं विलसतसे ॥६॥
झळके तेजखी हनुवटी ॥ प्रवाळशोभा दोहीं ओठीं ॥
दशनीं दीप्ती झळके मोठी ॥ सस्मित वदनीं बोलतां ॥७॥
नासिक सुरेख अति सुंदर ॥ विशाळ नेत्र कमळाकार ॥
व्यंकट भृकुटींचा आकार ॥ केशर भाळीं रेखिलें ॥८॥
श्रवणीं कुंडलांचा ढाळ ॥ दोहीं गल्लकीं झळाळ ॥
कोटी सूर्याचा उजाळ ॥ तमाळनीळ निजंगीं ॥९॥
तीर्थ व्रतें जप तप ध्यानें ॥ आणि हठयोग धूम्रमानें ॥
नलभे फळ तें भगवध्यानें ॥ प्राप्त होय निश्चयें ॥१०॥
ध्यानयोगें भवभय जाय ॥ कृष्णस्मरणें परमोत्साह ॥
निजानंद पूर्ण होय ॥ सर्व रंगीं समाम्यें ॥११॥

पद ५७९. [चाल-सदर.]
ऐसी तुझी कीर्ति म्यां ऐकिली ॥ध्रु०॥
स्मरतां नाम तुझें उफराटें ॥ केवळ वाल्मिक तें चोरटें ॥
पावन केलें कौतुक मोठें ॥ भवसंकट वारुनी ॥१॥
गणिका पक्षीं याच्या मिषें ॥ अजामिळ तो पुत्रोद्देशें ॥
नाम घेतां त्वां जगदिशें ॥ पावन केलें दोघांसी ॥२॥
पशू गजेंद्राकारणें ॥ उडि घालुनि नारायणें ॥
वनचर जळचरही उद्धरणें ॥ संदर्शनें दोघांसी ॥३॥
दैत्यें गांजितां प्रर्‍हाद ॥ करुनि असूरांचा उच्छेद ॥
भक्तवत्सल हें ब्रीद ॥ साच केलें आपुलें ॥४॥
नाना प्रसंगीं दौपदी ॥ संरक्षिली पदोपदीं ॥
पांडवांचें न्यून कधीं ॥ पडों दिलें त्वां नाहीं ॥५॥
युद्धिं पक्षिणीचिं पिलें ॥ पडतां तुजला बोभायिलें ॥
तेव्हां गजघंटे खालें ॥ त्वां वांचविलें गोविंदा ॥६॥
भक्ता पुंडरिकासाठीं ॥ उभें राहुनि भीमातटीं ॥
समपद समकर ठेवुवि कटीं ॥ वाळुवंटीं तिष्ठसी ॥७॥
हिंसक व्याध अगाध जीवांतें ॥ विंधुनि बाणें भक्षी त्यांतें ॥
उद्धरिलें त्वां कमळाकांतें ॥ हें आमुतें जाणवलें ॥८॥
दुर्बळ सुदामा ब्राह्मण ॥ तीन मुष्टी पोहे कण ॥
भक्षुनि संतोषें आपण ॥ सुवर्णनगरी वोपिली ॥९॥
अगणित निजभक्त उद्धरिले ॥ त्याचें परिमित कवणें धरिलें ॥
माझेविषयीं काय झालें ॥ उपेक्षिलें कां देवा ॥१०॥
किंवा कोठें गुंतलासी ॥ किंवा आहेसि दूरदेशीं ॥
किंवा भय वाटे मानसीं ॥ दुर्धर मार्ग न चालवे ॥११॥
पतीतपावन दीनबंधु ॥ अनाथनाथ करुणासिंधु ॥
ऐसा वर्णितां अगाधु ॥ महिमा बोलीं न बोलवे ॥१२॥
निजानंदें वेदश्रुती ॥ गाती पुराणें जर्जती ॥
नेती नेती शब्दें ह्मणती ॥ सहज पूर्ण निजरंगा ॥१३॥

पद ५८०. [चाल-सदर.]
जिवलग बंधु निजभक्त भगवंताचे ॥ध्रु०॥
येर येरां परस्परें ॥ भावें भजती परमादरें ॥
नाहीं त्रिभुवनीं दूसरें ॥ ऐसे सोयरे कोण्ही ॥१॥
एकमेका गौरविती ॥ तेणें वाढें परम प्रीती ॥
जीव प्राण घेती देती ॥ अंतीं एक एकाचे ॥२॥
मोक्ष लक्ष्मी देउनि भक्त ॥ देवं केले जीवन्मुक्त ॥
भाक्त जीवपणीं विरक्त ॥ अन्य शरणागत झालें ॥३॥
देव निजांपों निर्गुण ॥ भक्तांकारणें सगुण ॥
होउनि कानीं सांगे खुण ॥ मी काढितों चिल्लष्टें ॥४॥
त्याचा अनुभव म्हणाल कैसा ॥ तरि तो ज्याचा त्यासचि पुसा ॥
निजानंद रंगों सहसा ॥ नाहीं भेदभावना ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP