मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३१ ते ३५

पदसंग्रह - पदे ३१ ते ३५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३१.
ऐसी हे हरिची लीला जे अगम्य निगम पुराणा ॥धु०॥
संतसभे दाघेजण ॥ वादक संवादती पूर्ण ॥
परिसा श्रोते विद्वज्जन ॥ ऐक्य भावें सर्वही ॥१॥
दिनकरवंशीं बाळपणीं ॥ सुबाहु ताटिका निजबाणीं ॥
वधुनि ऋषीयज्ञ निर्वाणीं ॥ संरक्षिला श्रीरामें ॥२॥
ऐसा माझा राम निजमूर्ती ॥धृ०॥
यादववंशीं बाळपणीं ॥ पूतना शोषिली विंदानीं ॥
उपटुनि यमलार्जुन दोन्ही ॥ गोकुळ रक्षी श्रीरंग ॥३॥
ऐसा माझा पूर्णब्रह्म श्रीनिजरंग ॥धृ०॥
चरणर जस्पर्शे ॥ शिळा उद्धरिली ते अवलीळा ॥
भंगुनि चाप जनकबाळा ॥ पर्णियली चिच्छक्ती ॥४॥
संदर्शनें कुब्जा नारी ॥ दिव्यरूप करुनि हरी ॥
वधुनि भौमासुर निर्धारी ॥ सोळा सहस्र पर्णिल्या ॥५॥
मेळवुनि वानरदळा ॥ सेतूबंधन करुनी सकळा ॥
संहारुनी राक्षसकुळा ॥ रावण वधिला रघुनाथें ॥६॥
संगें घेऊनियां गोपाळ ॥ कृष्ण काळाचा महाकाळ ॥
मल्लां मर्दुनि कंसखळ ॥ वधिला कृष्णें क्षणमात्रें ॥७॥
लंका बिभीषणा दिधली ॥ लोकत्रयीं ख्याती केली ॥
नामें गणिका उद्धरिली ॥ माझ्या रामें कौतुकें ॥८॥
उग्रसेन मथुरापती ॥ केला कीर्ती ते त्रिजगतीं ॥
अजामिळा तो सद्नती ॥ कृष्णें स्मरणें दीघलीं ॥९॥
रामनामें महा दोषी ॥ वंद्य झाला वाल्मिकी ऋषी ॥
रामायण शतकोटीसी ॥ वदली वाचा भविष्य ॥१०॥
शूकमुखें भागवत ॥ श्रवणें परिक्षिती अद्भुत ॥
ब्रह्महत्येपासुनि मुक्त ॥ झाला पूर्ण निर्धारें ॥११॥
निरखुनि दोघांचा विचार ॥ संतीं निवडिला व्यवहार ॥
राम कृष्ण निर्विकार ॥ परब्रह्म ऐक्यत्वें ॥१२॥
पाहतां एकीं एकपण हरपलें ॥धृ०॥
सहज पूर्ण आत्माराम ॥ योगी मुनिजन विश्राम ॥
निजानंद तो निष्काम ॥ सर्वरंगीं रंगला ॥१३॥

पद ३२.
राम कृष्ण विष्णु नामें ॥ गाऊं स्वानंदें सप्रेमें ॥धृ०॥
अनन्य भावें हरि गुरु भजनें ॥ काया वाचा आणि मनें ॥१॥
निरहंकृती निष्कामता ॥ ब्रह्मीं ब्रम्हार्पण तत्वता ॥२॥
रंगीं रंगुनि निजानंदें ॥ नाचों कीर्तनीं स्वच्छंदें ॥३॥

पद ३३.
धन्य धन्य धन्य आम्ही परम मान्य आम्हां सारिखें अन्य कोण असे ॥
पाहतां लोकत्रयीं कोठें उणें कहीं परिपूर्ण तें आमुचे ठायीं दिसे ॥धृ०॥
विद्या वयसा कुळ स्वयंपाकीं सुशीळ सर्वज्ञ शास्रज्ञ ज्ञानी ॥ वर्णाश्रम कर्में विधियुक्त आचरों स्वमताचे अभिमानीं ॥
न्याय-नीती-वंत श्रीमंत सर्वदां दरिद्र न देखों स्वप्नीं ॥ ऐसें माया मोहें बरळती जे एक गुंतुनी विषयाचे ध्यानीं ॥१॥
एक ह्मणती आम्ही कृतकृत्य झालों मिरविलों लौकिकांत ॥ शचिपती सम भोग भोगिले ये लोकीं विश्व हें केलें अंकित ॥
ऐसे गर्वराशी वळघोनि आकाशीं दाविती शब्दसंकेत ॥ तेही काळें करुनि नेले नरकालया उरले ते ह्मणती शाश्वत ॥२॥
मळीण अंत:करणें अविधि आचरणें या देहीं तादात्म्य धरुनी ॥ कल्पांतींही त्यांस सुखप्राप्तीचा लेश नाहीं नाहीं त्रिभुवनीं ॥
संकल्पाच्या सन्निपातें बरळती मी देह माझें ह्मणोनि ॥ नि:संग निजरंग नेणोनी फिरतील लक्ष चौर्‍याऐशी योनी ॥३॥

पद ३४.
कृष्णा धांवे पावे कृष्णा धांवे पावे ॥ कृष्णा धांवे पावे ऐसे समयीं यावें दिनानाथा दीनबंधू ॥
कौरव षड्‌वैरी पीडिती नानापरी सोडवी करुणा सिंधू ॥धृ०॥
सुमती द्रौपदी शुद्धसत्वपदीं धर्मपत्नी पतिव्रता ॥ दुष्ट दुर्योधन हातीं सांपडली दावुनि कोप तिव्रता ॥
सभेमाजी मग्न करा ह्मणतां दु:शासनें ते धरुनि तत्वता ॥ घालितां निरियें हात जाणुनि कल्पांत बोभायिलें रमाकांता ॥१॥
भक्तांचा साहाकारी तूं नाना अवतारी गर्जती शास्त्रें पुराणें ॥ संकट पडतां भारी रक्षितो श्रीहरी धांवा करितां जिवें प्राणें ॥
साधुसंत मुनी बाह्या उभारूनी साक्ष देती याप्रमाणें ॥ मिथ्या वाद त्यांसीं येऊं नेदी ह्रषीकेशी हेंचि आजि तुझें देणें ॥२॥
सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा सर्वसाक्षि ओतप्रोत ॥ विश्वपटीं एकचि तंतू श्रीकृष्ण परब्रह्म अच्युतानंत ॥
ऐकोनियां श्रवणीं द्रौपदीची वाणी भक्तवत्सल दयावंत ॥ घालोनियां उडी आला लवडसवडी दाविती संत संकेत ॥३॥
अनुभवाची खुण अनुभवीं संपूर्ण जाणती दर्शनी ज्ञानी ॥ उभा पाठिराखा पाठिसि तो देखा राहिला भक्ताभिमानी ॥
दिव्य सोनेंसळा नेसवितां बाळा संतोषली याज्ञसेनी ॥ भक्तकामकल्पतरु निजरंगें देखती झाली निदानीं ॥४॥

पद ३५.
आतां काय उपाय करुं मी कोणाचे पाय धरुं ॥ ऐसा कोण बळी ज्याच्या बळें भव तक्षक विष उतरूं ॥धृ०॥
कैंचा देवधर्म कैंचें क्रियाकर्म रक्षिल मज ये विषयीं ॥ साधू संत कोण्ही पूजिले नाहीं सद्भावें लागुनि पायीं ॥
धनसुतदारपरिग्रह हे तों पाडिती सर्व अपायीं ॥ दाही दिशा माझे पाठिसी लागती तापलों मी तापत्नयीं ॥१॥
कैंचा मित्न सखा पाठिराखा बंधू हरिविण एका निदानीं ॥ तो तंव जन्मांतरीं अर्चिला नाहींंच कळों आलें या वरुनी ॥
पतीत पावन हरि धन्वंतरी एक ऐकिलें शास्त्र पुराणीं ॥ पाहतां नवही खंडीं ब्रह्मांडीं हरिविण सोडवितां नाहीं कोण्ही ॥२॥
तक्षक विषानळीं संतप्त ये काळीं गारुडी जरी हरि येता ॥ निर्विष करुनी कृपें सद्रुरु स्वरुपें संरक्षक पूर्ण होता ॥
विश्व भक्षक हा तक्षक मारुनी शाश्वत निज सुख देता ॥ तरीच निजानंदें रंग्नि मनिंचा संकल्प सिद्धी जाता ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP