मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३६ ते ४०

पदसंग्रह - पदे ३६ ते ४०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३६.
तो मज आवडतो ॥धृ०॥
वर्णाश्रमविधि पाळी ॥ काम्यनिषेधही गाळी ।
अहं ममतेतें जाळी ॥ आसुरी गुण निर्दाळी ॥१॥
जनीं जनार्दन पाहे ॥ विकल्प लेश न साहे ॥
देहाभिमान न वाहे ॥ स्वरूपीं निश्वळ राहे ॥२॥
आत्मानात्मविवेकीं ॥ न पडे या भवशोकीं ॥
विषवत्‌ विषय विलोकी ॥ विदेह विचरे लोकीं ॥३॥
निजानंदपद भोगी ॥ तारित जीव भवरोगीं ॥
निर्विकार नि:संगीं ॥ रंगला निजरंगीं ॥४॥

पद ३७.
योगीदर्शन दुर्लभ रे योगीदर्शन दुर्लभ रे ॥धृ०॥
धातुमूर्ति लक्ष प्रतिमा पूजन करितां पूजिला एक शालिग्राम ॥ कोटि शालिग्राम पूजितां एक अग्नि अर्चनीं नित्य नेम ॥
लक्ष अग्नि पूजितां सूर्यपूजन एक त्याहुनि अधिक द्विजोत्तम ॥ त्रि कोटी विप्र अन्नें संतृप्त तैं योगीदर्शन पूर्ण काम ॥१॥
शिवालयें सिद्व एकक्षोणी संख्या निर्मितां सद्भावें करुनी ॥ अनर्घ्य रत्नें सप्तही सागर देतां ब्राह्मणासी भरोनी ॥
जांबुनद कनक मेरुभार एक वजन केलें तुळा धरुनी ॥ तेंही दान देतां सत्पात्र पाहुनी तर्‍ही सरी न पवती कोणी ॥२॥
परब्रह्मीं विश्राम झाला ह्मणुनि नाम योगी हें बोलिजे त्यासी ॥ ब्रह्मविद ते ब्रह्मश्रुतिवाक्य नि:सीम प्रतिपाद्येसी ॥
संदर्शनें महा पातकांच्या राशी नाशतील निश्वयेंसी ॥ सहज पूर्ण निजानंदि रंगले ते ॥ निर्गुणपूर निवासी ॥३॥

पद ३८.
हरि गुरु चरण स्मरणीं अंत:करणीं सुख झालें ॥ परा पारुषली तें मज न बोलवे सुख बोले ॥धृ०॥
मुकें साखर सेवुनि गोडी सांगो जातां वाचें ॥ नि:शब्द शब्दें गर्जे कांहीं हांसे कांहीं नाचे ॥१॥
अंतरिचें सुख अंतर्मुख तें जाणति चिन्हावरुनी ॥ शाब्दिक ज्ञाने तार्किक बोलती परोक्षद्दष्टी ज्ञानी ॥२॥
जाणि नेणिव सरली केवळ जाणणें मात्रचि उरलें ॥ उरलें पुरलें हेंही जेथें ह्मणते ह्मणणें सरलें ॥३॥
तन्न तन्न हा शब्द निमाला सहज पूर्ण निजरंगीं ॥ कल्पांतीं जळ नभमय झालें प्रमाणरहित तरंगीं ॥४॥

पद ३९.
विवेकपूर्ण प्रबोधी रे ॥ अनुकंपें मन बुद्धि रे ॥
निगमाचार्य स्वमतें विवरुनि निरसी सर्व उपाधी रे ॥धृ०॥
प्रथम नमुनि गुरु गणपतीतें ॥ वंदिन सत्य सरस्वतितें ॥
प्रसन्न होउनि निजपद देउनि हरितिल दुर्जय दुर्गतितें ॥१॥
वर्णाश्रमविधि पळीं रे ॥ काम्य निषेध ही गाळीं रे ॥
निरहंकृति निर्हेतुक कर्में ब्रह्मार्पण करि समुळीं रे ॥२॥
भोगुनि आसुरि संपत्तीतें ॥ उन्मत्त होती तीं पतितें ॥
व्यभिचारिण परपुरुष विलोकुनि जैसी त्यागित निज पतितें ॥३॥
हरि गुरु चरण स्मरणें रे ॥ दुस्तरतर भव तरणें रे ॥
नित्या नित्य विवेक शुधसत्व अंत:करणें रे ॥४॥
अनित्य सर्व पसारा रे ॥ भुलों नको संसारा रे ॥
विषवत्‌ विषय पियुषवत्‌ मानुनी सेविसि कां अविचारा रे ॥५॥
होउनियां मतिमंद रे ॥ करिसी नाना छंद रे ॥
भाग्यहीना तुज होईल कै म्ग प्राप्त परमानंद रे ॥६॥
धनसुतदारा परिग्रह रे ॥ हा सर्वहि वैभव संग्रह रे ॥
देहीं देहाभिमान लागला मनचंद्रातें हा ग्रह रे ॥७॥
प्रपंच सुखरूप जो मानी ॥ पामर नर खर अज्ञानी ॥
व्याघ्रसंगें धेनु सुकरुप तरि हा होतां सुकदानीं ॥८॥
अस्थिमांसमळमूत्रें रे भरली तनु अपवित्रें रे ॥
ते मी माझी ह्मणती जाणत जाणत ते कुपात्र रे ॥९॥
असद्विकारी जड काया ॥ चित्र तरुची हे छाया ॥
भगवद्वचन प्रमाण यदर्थीं दुष्ट दुरत्यय मम माया ॥१०॥
विषयेद्रिय संयोगीं रे ॥ अमृतोपम सुख भोगीं रे ॥
परिणमीं विष काय बापुडें मारक दुर्भवरोगी रे ॥११॥
पढतमूर्ख तूं बहिर्मुखा ॥ हरिविण दुसरा कोण सखा ॥
जाणत जाणत वेडें होसी कां भुलसी या विषयसुखा ॥१२॥
परदोष दर्शनीं दक्ष रे ॥ प्रत्यक्ष जैसा यक्ष रे ॥
स्वदोष दर्शन पाहासी कां सर्वदा साकांक्ष रे ॥१३॥
सद्नुरु भजनेवीण रे ॥ ह्मणविसि आपण प्रवीण रे ॥
शिखिपक्षी बहुलोचन परि त्या चक्षुवांचुनि शीण रे ॥१४॥
हो झालें तें झालें रे ॥ सांगेन एका बोलं रे ॥
अनुतापेंविण सर्व निरर्थक ॥ जें जें कांही केलें रे ॥१५॥
निरभिमान सद्बावें रे ॥ गुरुतें शरण रिघावें रे ॥
देव-द्विज हरिभक्त दयार्णव ॥ सदैव त्यांसि भज वें रे ॥१६॥
सर्वभूतीं भगवंत रे ॥ नि:संशय निभ्रांत रे ॥
भूतदया ह्रदयीं निशिदिनिं ते अक्षयी श्रीमंत रे ॥१७॥
स्वधर्म मुख्य सनातन रे ॥ सदाचारसंपन्न रे ॥
श्रोत्रीं ब्रह्मपरायण ते नारायण धन्य धन्य रे ॥१८॥
तरोनि तारक व्हावें रे ॥ तरीच जन्मा यावें रे ॥
हाचि परम पुरुषार्थ करावा ॥ नरदेहीं सद्भावें रे ॥१९॥
भक्ति विरक्तिज्ञानें रे ॥ परमामृतरसपानें रे ॥
निजानंदपदभुवनिं राहावें सच्चित्‌ सुखरुप मनें रे ॥२०॥
एकविसा श्लोकीं रे ॥ अभंग रंग विलीकीं रे ॥
श्री रंगानुज तनुज मनीं संपूर्ण पूर्णश्लोकी रे ॥२१॥

पद ४०.
कैसा बाजार केलावो ॥ संसारातें येउनि भांडवलाचा मातेरा झाला ॥धृ०॥
काय केलें हे जीवाजी नायको मुद्दल गमाविलें कैसें ॥ बहुतां जन्मींचें मेळविलें होतें करुनी नाना सायासें ॥
आपुली ह नी एक जगाचि मर मर लौकिकांत होय हंसें ॥ हें ना तैंसें होउनि याल जाल किती भ्रांतरूप पिसें जैसें ॥१॥
पांचा पंचकाच्या मेळ्यामध्यें चोहटा लागेल व्यवहार करणें ॥ खोटें होतां दूत येतिल धावुनि चावडीस लागे जाणें ॥
काळ कोतवाल न्यायनिष्ठुर तो घडविल भोग भोगणें ॥ ममतेची बेडी घालुनि पुसतां कवर्ड चाही हिशोब देणें ॥२॥
साधु संत शेटे महाजन महा नाडा आधीं शरण जावें होतें ॥ निष्काम निरहंकृतिनें दिवाणांत रुजूं व्हावें त्यांच्या मतें ॥
कर्म तेंचि ब्रह्म जाणुनियां वर्म आचरावें स्वस्थ चित्तें ॥ लाभालाभीं सम करावा होता उदीम विवेकाच्या हातें ॥३॥
लक्ष चौर्‍यायशी कारागृहवासीं ॥ आहेतीं मळमूत्रें भरलीं ॥ घाली फेडीकरितां जाजावलें जीव तरि आहे तीच उरलीं ॥
काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ यांची नाहीं हांव पुरली ॥ हाचि उपाय अपाय निवारक तारक जरी वृत्ती फिरली ॥४॥
आतां एक करा सार तें विचारा असार निरसुनि वेगें ॥ अहंकर्ता याची न करुनियां वार्ता राहुनियां साधुसंगें ॥
या मार्गीं विषयी ते मुमुक्षु होउनि मुक्तहि झाले प्रसंगें ॥ आत्मलाभ लक्ष मुद्रा ते लाधले सहज पूर्ण निजरंगें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP