मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३८६ ते ३९०

पदसंग्रह - पदे ३८६ ते ३९०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३८६. (सखया रामा० या चा.)
साजणी माझ्या रामा आणुनि कोणी द्या हो ॥धृ०॥
क्षमा दया उपरती भक्ती भावना शांती ॥ सखिया साजणी वेगीं या वो ॥१॥
राघवेविण कांहीं नावडे वो बाई ॥ विरस वाटतो देहभावो ॥२॥
निजरूपीं मानस सरे रंगलें मागुति न फिरे ॥ जिव जाईल तरि जावो ॥३॥

पद ३८७. [चाल सदर.]
साजणी बाई तें सुख बोलतां न ये ॥धृ०॥
सुख तें बोलतां न ये केविं मी सांगों सये ॥ प्राण पांगुळा ठाये ॥१॥
सद्नुरु कृपाद्दष्टी बुद्धि बोधासि भेटी ॥ सानंदमय झाली सृष्टीं ॥२॥
ममता पालटली ठायीं चोज तें सांगों कायी ॥ तन्मय हा बोल उरला नाहीं ॥३॥
संकल्प भंगला भव हा वो रंगला ॥ अवघा निजानंद रंगला ॥४॥

पद ३८८.
रामराया रे छेदीं दुस्तर माया रे ॥धृ०॥
बाळपणीं रति खेळणियावरि वारि नसे अति भूलि भरे ॥
यौवन नित्य मदोन्मत्त डुल्लत व्याकुळ चित्त सकामशरें ॥१॥
शेष दशा जसि अंध निशा गति नासुनियां मतिभ्रंश पुरा ॥
शेवटिले दिनिं देह हुताशनीं सर्वहि घालुनि येती घरा ॥२॥
तात मात सुत भ्रात सकामित अंतर हेंचि निरंतरही ॥
संगविना निजरंग तुझा गुज जाणसि तूं बहिरंतरही ॥३॥

पद ३८९.
क्षणभंगुर पाहीं हो जीवित ॥धृ०॥
स्वधर्मीं रत हो भजनीं निरत हो शोखविगत हो ॥ विषय वमनवत्‌ हो ॥१॥
अनृत त्यजावें हरिसि भजावें निज उमजावें ॥ पुनरपि नुपजावें ॥२॥
सज्जनवृदें भज निर्द्वंद्वें निजसुखछंदें ॥ रंग निजानंदें ॥३॥


पद ३९०. [बोलणें फोल झालें या चा.]
कांहीं बोल रे बोल कान्हा कांहीं बोल रे नीज न ये ॥धृ०॥
बोल उद्बवला कोठून ॥ बोला बोलवितें कोण ॥
मूळ पाहातां शोधून ॥ भवबंधन मिथ्या ॥१॥
द्दष्टीविण पाहे ॥ चरणेविण चालताहे ॥
रूप नसोनियां आहे ॥ होय तें एक ॥२॥
कृष्ण म्हणे गे आई ॥ निज शोधुनियां पाहीं ॥
निज पाडितांचि ठाईं ॥ जन्ममरण कैंचें ॥३॥
नीज निजानंद रूप ॥ निजगुरूचें स्वरूप ॥
चरणीं रंगतां तद्रूप ॥ आपेंआप होइजे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP