पदसंग्रह - पदे १२६ ते १३०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद १२६.
व्याप्य व्यापक सर्वां भूतीं ॥ स्थिरचर श्रीहरिच्या विभूती ॥धृ०॥
जग नग कनक जनक हरि चिन्मय ॥ जाणुनि स्वरुपीं मुनी मन तन्मय ॥१॥
ऊर्णनाभी उगळित तंतू ॥ अद्वितिय दिसतांहि परंतु ॥२॥
नाना रंग तरंग विकारी ॥ निजानंद जळ-निधि अविकारी ॥३॥
पद १२७.
बाई माझें दैवत श्रागुरुराय ॥धृ०॥
चारी मुक्ती दासी होती ॥ नमितां श्रीगुरुचे पाय ॥१॥
ब्रह्मादिक जे ध्यानीं ध्याती मानुनि हाचि उपाय ॥२॥
पूर्ण रंग गुरुराजविना आन नाहीं तरणोपाय ॥३॥
पद १२८.
ऐसा द्दढ निश्चय हा केला ॥धृ०॥
रज्जु सर्प मुळिं नाहिंच त्याला ॥ मारुनि कोण आला ॥१॥
बद्ध नाहीं तेथें मोक्ष तो कायी ॥ संसृति आंचवला ॥२॥
सहज पूर्ण निज रंगें ज्ञानीं ॥ नि:संशय झाला ॥३॥
पद १२९.
आम्ही हरिदासांच्या दासी ॥ झालों अखंड वैकुंठवासी ॥धृ०॥
देहीं असतांचि वैकुंठ पाहीं ॥ येणें जाणें नलगे काहीं ॥१॥
पाय क्षाळुनि पद-तोय घेऊं ॥ शेष उच्छिष्ट त्यांचें सेवुं ॥२॥
पदोपदीं श्वासोच्छवासीं ॥ गाऊं गीतीं ग्रासे ग्रासीं ॥३॥
एक सत्ता त्रिभुवनीं ज्याची ॥ कीर्ती वर्णुं त्रैलोक्यीं त्याची ॥४॥
हेंचि काम आतां करूं ॥ संतपाउलें ह्रदयीं धरुं ॥५॥
कामाभेणें उसंत नाहीं ॥ मागों देवासि हे सर्व दांही ॥६॥
दास्य दासाचें देव करी ॥ निजानंदें रंग भरी ॥७॥
पद १३०.
तुजहुनि तुझ्या नामाचा प्रताप ॥ पाहातां अमूप कोटी गुणें ॥धृ०॥
अयोध्या एकली वैकुंठा त्वां नेली ॥ नामें उद्धरिलीं त्रिभुवनें ॥१॥
वाल्मिकादी महापापाचिया राशी ॥ केले देव ऋषी नामें तुझ्या ॥२॥
नामें निजानंदीं रंगउनि पूर्ण ॥ जन नगीं सुवर्ण होउनि ठेले ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP