पदसंग्रह - पदे ५२१ ते ५२५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ५२१.
पावुनियां नरकाया ॥ आम्ही जाऊं कां नरका या ॥ याचि देहीं याचि डोळां लागावें हरि पायां ॥ध्रु०॥
साधुसज्जनीं नवविध भजनीं लागुनियां दिनरजनीं ॥ सच्चित्सुखमय होउनि राहूं नित्य निरंजनीं ॥१॥
सत्कर्में ब्रह्मार्पण निरंहक्रुतिनें सर्व करूनि ॥ निजानंदघन ब्रह्म सनातन होऊं गगन भरूनि ॥२॥
दुर्लभ हा नरदेह यांतही दुर्लभ सद्नुरु भेटे ॥ सहज पूर्ण निजरंग पदीं मग ब्रह्मसम अन्वय दाटे ॥३॥
पद ५२२.
नरमृग पडला रे पडला गुंतुनि मायापाशीं ॥ काळ व्याध वध करितो प्रतिदिनीं लव पळ क्षणक्षणेशीं ॥ध्रु०॥
आद्यंती न दिसे तें मध्यें भासे मृगजळ जैसें ॥ तैसें देह अशाश्वत असतां माझें म्हणत पिसें ॥१॥
सुगंधकंद स्वनाभिसीं, हा मतिमंद असोनि न जाणे ॥ हिंडे अष्ट दिशा नर तैसा आत्मतत्व सुक नेणें ॥२॥
जीवन त्यजुनि तरंग इच्छी म्हणुनि कुरंग म्हणावा ॥ पूर्णरंग चित्तंतुविणें हा जगपट केविं विणावा ॥३॥
पद ५२३.
सर्व जीवां जीवन मी त्या मज न भजावें कां ॥ भयकृद्भयनाशन मी ऐसें न समजावें कां ॥ध्रु०॥
अनंत ब्रह्मांडनायक निजसुकदायक सत्पात्रासि ॥ अनन्य शरणागत प्रतिपाळक चाळक जीवमात्रासी ॥१॥
निगमागम वर्णाश्रमधर्म सुगम करुनि दाखविती ॥ मत्प्राप्तिस्तव हरिगुरुभजनें परमामृत चाखविती ॥२॥
सहज पूर्ण निज रंग रंगलों अभंग मी चिद्योमीं ॥ ओतप्रोत हरि भरलों सबाह्मांतर्यामीं ॥३॥
पद ५२४. [काशीराजकृत]
मन हें चंचल या रितिचें वो ॥ कौतुक याचें या गतिचें वो ॥ध्रु०॥
लव पळ एके ठायीं न वसे लंपट विषय-रतीचें वो ॥ त्रिभुवन फिरतें येतें जातें कारण हें दुष्कृतिचें वो ॥१॥
करितें बहु संकल्प विकल्पीं न म्हणे मन मी यतिचें वो ॥ अविधीं वर्ततां दुर्लभ नरदेह जाइल न कळे हातिचें बो ॥२॥
दुष्ट कल्पना करितें नाना वळिलें हें दुष्कृतिचें वो ॥ आत्मानात्मविवेकीं केलें मातेरें या मतिचें वो ॥३॥
परि गुण उत्तम एक आहे कीं जैसें करणें सतिचें वो ॥ ज्या दिधली त्या रत सर्वस्वें वचन नुलंघी पतिचें वो ॥४॥
निजरंगें रंगुनि वैभव सुखसाधनसंपत्तीचें वो ॥ श्रीरंगानुजतनुजें त्याला दिधलें सार श्रुतिचें वो ॥५॥
पद ५२५. [काशीराजकृत]
सहपरिवारें येउनि मंडप शोभिवंत करावा ॥ मनबुद्धयादिक इंद्रियवर्गीं मज न मानुनी परावा ॥ध्रु०॥
आमुचि प्रतिती कन्या हे अनुरागें उपवर झाली वो ॥ आत्माराम परात्पर नवरा ब्रह्मार्पण त्या केली वो ॥१॥
मन संकल्पविकल्प त्यजुनी द्दढ निश्वय बुद्धीनें वो ॥ दैवी संपत्ति घेउनि यावें सत्वर वेदविधीनें वो ॥२॥
स्मरणीं वाचा गोवा श्रवणीं श्रवण निरंतर ठेवा वो ॥ नयन स्वरूपीं लावा करणें करचरणें हरि सेवा वो ॥३॥
ऐक्यत्वाचा बोहला पाहावा सोहाळा निज लग्नाचा वो ॥ सहज पूर्ण निजानंद होइल प्रसाद तुमचा वो ॥४॥
विशेष काय ल्याहावें भावें सोयरीक पाहिली वो ॥ श्रीरंगानुजतनुजें ऐशी लग्नपत्रिका लिहिली वो ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP