मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १९१ ते १९५

पदसंग्रह - पदे १९१ ते १९५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १९१.
बंध मोक्षाची मोक्षाची ॥ अनुभव खुण लक्षाची ॥धृ०॥
स्पन्पीं बंधन प्राप्त ॥ जागृत होतां म्हणती मुक्त ॥१॥
घट मठ भंगी महदाकाश ॥ छेदभेदरहित अविनाश ॥२॥
उदयास्तुविण निजरंग ॥ सहजें चिद्भानु नि:संग ॥३॥

पद १९२.
हरिगुरु भजन करा भजन करा ॥ तरोनियां जन तारा ॥धृ०॥
सारासार विचारें ॥ शम-दम-योगें विहिताचारें ॥१॥
निरहंकृति निष्कामें ॥ करुनी ब्रह्मार्पण सत्कर्में ॥२॥
सहज पूर्ण निजरंगें ॥ भेदाभेद गिळुनि सर्वांगें ॥३॥

पद १९३.
प्रपंच परमार्था परमार्था ॥ अंतर इतुकेंचि पार्था ॥धृ०॥
माती घट पट तंतू ॥ कनकीं कटक तसे जिवजंतू ॥१॥
स्थाणु पुरुष अहि दोर ॥ शुक्तिकेवरि रजत-विकार ॥२॥
निजानंदीं नाना रंग ॥ उदकीं लहरीओघ तरंग ॥३॥

पद १९४.
भ्रमरा भ्रमसी कां भ्रमसी कां ॥ विषय वनीं श्रमसि कां ॥धृ०॥
कंटक वन अति दारुण ॥ तेथें सहसा न करीं रुणझुण ॥१॥
गुंतुनि न पडे पंचकोशीं ॥ मुक्त होईं चिदाकाशीं ॥२॥
हरिपद-पद्मपरागीं ॥ तन्मय होउनि चिन्मय भोगीं ॥३॥
परमामृत-रसपानें ॥ विचरें अनुदिन हरिगुण गाणें ॥४॥
रंगोनि निजानंदीं ॥ विचरें हरिगुपद-मकरंदीं ॥५॥

पद १९५.
हरिजन हरिसम रे हरिसम रे ॥ गर्जति निगमागम रे ॥धृ०॥
संत सगुण परब्रह्म ॥ विरळा जाणें याचें वर्म ॥१॥
निराकार आकारलें ॥ तूप विखरलें तें थिजलें ॥२॥
रंगले ते निजानंदें ॥ जाणति नेणति हें मतिमंदें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP