मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २५६ ते २६०

पदसंग्रह - पदे २५६ ते २६०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २५६. [चाल सदर.]
सद्रुप तूंचि चिद्रुप तूंचि स्वयें आनंदस्वरुप ॥धृ०॥
सद्नुरु बाप माय वेगीं धरीं पाय तेणेंचि आनंद होय ॥ लटिकेंचि माथां घेतोसि काय मिथ्या नामरूप जाय ॥
मातेचें शोणित पितयाचें रेत दोन्हीं मिश्रित पिंड होय ॥ बारावे दिवशीं नाम ठेविलें तें साचचि मानिसि काय ॥१॥
तुझें स्थूळ देह पंचभूतिक त्याचा विचार ऐक ॥ धावन प्रसरण बोलणें आकुंचन निरोधन वायुचें देख ॥
काम क्रोध शोक लोभ भय हेंचि आकाश ऐक ॥ क्षुधा तृषा आलस्य निद्रा संग हे तेजाचे जाण नेमक ॥२॥
लाळ मूत्र शोणित लज्जा आणि रेत हे तंव आप निर्धार ॥ अस्थि मांस त्वचां नाडी रोम वाचा पृथ्विचा होय साचार ॥
हें स्थूळ शरीर लिंग-देह बिर्‍हाड ऐक त्याचा विचार ॥ पंचभूतेंविण लिंगदेह नाहीं ऐसा सांगेन प्रकार ॥३॥
त्यांत व्यान उदान समान अपान प्राण वायु साचार ॥ श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण यांचा ज्ञानेंद्रियें तेज आकार ॥
वाचा पाणी पाद शिस्र गुद कर्मेंद्रियें आप-विस्तार ॥ अंत:करण मन बुद्धि चित्त अहंकास आकाश पंच प्रकार ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस गंध जाण पृथ्वीविषय पंचक ॥ हें ऐसें जाण वासनामय लिंग देह पुर्यष्टक ॥
याचें मूळ जाण अज्ञान कारण सांगेन तुज ऐक ॥ स्वरुपीं अति गूढ प्रपंचीं सद्दढ तेंचि होय अविद्यक ॥५॥
स्वरुपीं विस्मरण प्रापंचिक ज्ञान तोचि देह कारण ॥ जो जो देह प्राप्त तोचि चिदात्मक त्याचें नांव जीव जाण ॥
ऐसे जीव अनंत होती माये आंत सोडवी तयांसि कवण ॥ गुरुकृपा जाण होय तुर्या जाणें निरसी सर्वही भान ॥६॥
तुर्या ती कैसी सावध परियेसीं जिचेनि सर्व देखसी ॥ तत्त्वमसि वाक्य जिचेनि ऐकसी तीच तुर्या अहर्निशीं ॥
स्वानंदस्फुरण अखंड स्मरण उन्मनि हे ज्ञानराशी ॥ स्वामी दीनानाथ निजरंगीं समर्थ निरसिलें मी-तूं-पणासी ॥७॥

पद २५७. राग जोगी ताल बिलंदी. (चा. सदर.)
मी तो सहज रिकामा नये एकहि कामा रे ॥धृ०॥
करिं धरुनि संतीं दिधली विश्रांति लडिवाळ तयाचें बाळ ॥ बैसवुनि अंकीं शांतिपालवे झांकी माउली परम कृपाळ ॥
ज्ञानामृत गुप्त तेणें केलें तृप्त तोडरिं बांधीला काळ ॥ निर्भय झालों आतां कार्यकर्तव्यता राहिले सर्व पाल्हाळ ॥१॥
जें जें दिसे तें तें सत्ताविलसें दुजें नाढळेचि मज रे ॥ एकला एकट दुजियाचा विट ब्रह्मारण्यिं केली शेज ॥
लौकिकाचें कान नाहीं ठेली लाज अखंडता निजीं नीज ॥ स्व-स्वरुपीं द्दष्टी स्वानंदें संतुष्टी माझें मज वाटे चोज ॥२॥
वर्णाश्रमधर्म याति कुळकर्म विजाति न साहे संगा ॥ माझा मीं सहज आत्मत्वाचे वोजें मी माझे पावलों भंगा ॥
बद्ध-मोक्षभाव दोन्ही झाले वाव नि:संगता आली रंगा ॥ निजानंदें बुद्धी बोधली हो जैसी सागरीं मिनली गंगा ॥३॥

पद २५८. (कवण तुम्ही कवणाचे या चा.)
प्राणी भुलला रे ॥धृ०॥
वेदपरायण शास्र सुभाषित उत्तम पंडित झाला ॥ योग-लीला सकला अनुलक्षिति वायु समग्रहि प्याला ॥
भूतभविण्य गमे समयीं यम नियम वश्य तयाला ॥ आत्मकळा न कळे भ्रमला नर व्यर्थ पराक्रम गेला ॥१॥
आचरला तप सर्वहि उत्तर दक्षिण मानस केलें ॥ योग क्रिया विधि तो विधीपूर्वक मंत्राराधन झालें ॥
आगम साधुनि शक्ति उपासिली वैदिक सिद्धीसि नेलें ॥ आत्मकळा नकळे भ्रमला नर ॥ सर्वहि व्यर्थचि गेलें ॥२॥
आसन घालुनि अंतरिक्ष रविमंडळ भेदुनि जाय ॥ बोधक शक्ति बृहस्पतिसाद्दश विक्रम शक्र न साहे ॥
साधक बाधक सर्व सुचे पुरुषार्थहि त्रिविध वाहे ॥ आत्म-कळा नकळे भ्रमला नर ॥ सर्व निरर्थक पाहे ॥३॥
क्रूर तपें अति आचरला कळि-काळहि द्दष्टिस नाणी ॥ शूरपणें अमरावति जिंकुनि सत्वर अमृत आणी ॥
वाक्य वृथा न वदे सहसा विधिसाम्य अनुस्यूत वाणी ॥ आत्म-कळा न कळे भ्रमला नर ॥ होय न चुकत हाणी ॥४॥
नित्यानित्य विचार विलोकुनि शुद्ध विराग धरावा ॥ भावबळें निज-रामपदांबुजिं आश्रय पूर्ण करावा ॥
रंग अभंग निजिं निज नि:श्वयें मीपण हेत हरावा ॥ नेति मुखें श्रुति येथुनि तन्मय शब्द नि:शब्द वरावा ॥५॥
जाणिव सांडोनि, जाणे चिन्मय, त्यासिच बाणे ॥धृ०॥

पद २५९. (चाल सदर)
रामा सोडविं रे सखया सोडवीं रे ॥धृ०॥
सद्वुद्धि जानकी बोलताहे निकी अवस्था दाटली पोटीं ॥ जिविंचिया जिवा आत्मया राघवा काय मी सांगों हे गोष्टी ॥
देह अहंकार रावण साचार प्रकृति याची खोटी ॥ नेतो मज दुष्ट नष्ट हा पापिष्ट करुनियां त्वरा मोठी ॥१॥
देह पर्णकुटीमाजीं मी असतां स्वप्रकाशा तुज नेणें ॥ मायिक मरीची नेणोनियां त्याची कंचुकि दे तुज म्हणें ॥
अभिलाष-बोलें तुज दुराविलें मी काय बापुडी जाणें ॥ केलें कर्म कुडें न चालेचि पुढें लंकेसि जाहलें येणें ॥२॥
उपाधिं भुललें सांडुनियां लक्ष लक्ष्मणा दिला त्रास ॥ तयासि अंतर पडतां सत्वर निजहिता झाला नाश ॥
अशोकवनीं ठेवियलें परी शोकें केलें कासावीस ॥ सुखविसाविया निज सोयरिया घेईं तूं आपुलें यश ॥३॥
अंतरिंचा सखा जाणें सुखदु:खा करुणा तयासि आली ॥ विचार मारुति पाठवुनियां साचार शुद्धि केली ॥
बोध-सेना संगें घेउनियां लिंगदेह-लंका वेढियली ॥ मारितां अहंरिपु देह देहबुद्धी तेचि झाली सोहं सिद्धी ॥४॥
बुद्धि बोधा योग होतांचि वियोग तुटला जीवा-शिवाचा ॥ दोघां एकपण हेंही बोले कोण परतल्या चारी वाचा ॥
ऐक्यपदीं पाहों सत्व-संपत्तिचा आनंद मातला साचा ॥ निजानंद पाहीं दुजा रंग नाहीं सिद्धांत सार श्रुतीचा ॥५॥
रामा बोधिलें रे भवदु:अख छेदिलें रे ॥धृ०॥

पद २६०. (चाल-कवण तुम्ही कवणाचे०)
मना सावध रे सखया सावध रे ॥धृ०॥
विसरुनि निजमुख प्रपंचिं तूं देख भुललासि केविं वायां ॥ सारासार दोन्हीं विचार टाकुनि साचचि मानिलि काया ॥
ब्रह्मादिकां जे दुर्जय ते तुज आकळेल केवीं माया ॥ सर्वहि नैश्वर जाणुनि सत्वर भज श्रीगुरुराया ॥१॥
लोक लोकपाळ पृथ्वीचे भूपाळ सार्वभीम तेही गेले ॥ इंद्र चंद्र सुर ब्रह्मा हरिहर काळाचे वदनीं ठेले ॥
तेथें तूं बापुडें असावध वेडें कां रे डोळे झांकियलें ॥ न भरतां पळ पडसी विकळ नचलेचि कांहीं केलें ॥२॥
शैवि कां वैष्णवी दिक्षा नित्य नवी निजहिता लागीं धरीं ॥ नवविध भक्त करुनियां आसक्ति विषयांचि तोडीं बरी ॥
साधन चतुष्टय साधुनियां वृत्ति हे सत्वस्थ करीं ॥ निजानंद संगें ब्रह्मसुखीं रंगें मुक्ति सायुज्यता वरीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP