मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३०१ ते ३०५

पदसंग्रह - पदे ३०१ ते ३०५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३०१. (कळों आली माव रे या चालीवर)
भक्तांचा विश्राम रे अंकिला श्रीराम रे ॥ कैवल्याचें धाम भक्तां करी पूर्ण काम रे ॥धृ०॥
अंबरिषासाठीं रे दुर्वासाच्या पाठीं रे ॥ लाविलें स्वचक्र कृपा सद्भक्तांचि मोठी रे ॥१॥
घेतां आळी बाळकें त्यासि विश्वपाळकें ॥ क्षीरसिंधु दिला मुनिमानसमराळकें ॥२॥
होता ऋषीशाप रे जाहलि शीळारूप रे ॥ चरणरजस्पर्शें झाली अहल्या निष्पाप रे ॥३॥
हाणोनियां चक्र रे विदारिला नक्र रे ॥ गजा गौरविलें तैसें न पवेचि शक्र रे ॥४॥
द्रौपदीची लाज रे रक्षी महाराज रे ॥ पांडवांचे घरीं करी सर्वस्वेंशीं काज रे ॥५॥
प्रर्‍हादाच्या बोलें रे अत्यद्भुत केलें रे ॥ अव्यक्त रूपडें भकालागीं व्यक्त जाहलें रे ॥६॥
रामीं रत चित्त रे तेचि भक्त युक्त रे ॥ निजानंदें रंगुनियां जाहले जीवन्मुक्त रे ॥७॥
पद ३०२.
मनुजा जागरे स्वरुपीं जागरे ॥धृ०॥
कायसा भ्रम कां अहंममतावनीं श्रमसी वृथा ॥ भज भज सत्पथा, वद भगवत्कथा ॥१॥
जाग जाग असार भाग त्याग त्यजुनि वाग स्वमंदिरीं ॥ भ्रम टाकीं दुरी, भज भज श्रीहरी ॥२॥
काय सार्थक इंद्रियार्थ अनर्थकारक सर्वदा रति न धरी कदां ॥ भज भगवत्पदा ॥३॥
पंचकोश षडोर्मि षड्‌रिपु राग द्वेष त्रिताप रे ॥ अति संताप रे ॥ धरि अनुताप रे ॥४॥
सत्समागम शास्त्रसंगम, सुगम हाचि उपाय रे ॥ चुकविं अपाय रे ॥ धरि गुरुपाय रे ॥५॥
श्रीगुरुपदपंकजीं मन रंगतां निज पावसी ॥ परम सुखावसी ॥ स्वपदीं स्थिरावसी जागे रे ॥६॥

पद ३०३.  (कवण तुम्ही कवणाचे या चा.)
मनुजा सावध सावध रे ॥ सावध सावध काळ-व्याळ तुज गिळीतसे सगळें ॥
देव दयानिधि श्रीगुरु गारुडी पालवी भावबळें ॥धृ०॥
हित अहित मना न विचारिसी झांकुनि नेत्र सदां ॥ कामकर्दमीं लोळसि निशिदिनिं मानुनि सौख्यप्रदा ॥
वीज लवोनि सरे सुख तेविं सवेग घडे आपदा ॥ इंद्रियग्राम विराम पडे मग बोलसि राम कदां रे ॥१॥
सिंह जळीं प्रतिबिंब विलोकुनि घालित तेथ उडी ॥ हंस गगनिंचा तारा उदकीं निरखुनि देत बुडी ॥
मूढ कसा मृग नाभि उपेक्षुनि हिंडत बुद्धि कुडी ॥ तेविं सखा हरि सांडुनियां दुरी फिरसी देशधडी ॥२॥
इंद्रजाळ मृगतोय जसें जगडंबर हा विलसे ॥ स्वप्नदशे गज मत्त तुरंगम संभ्रम तेविं दिसे ॥
क्रूर भवार्णवकर्णधार गुरु आन उपाय नसे ॥ पूर्ण रंग निज रामपदीं मग दुर्गम काय असे ॥३॥

पद ३०४. (झेलारे भाईनो झेलारे)
नमन सर्वगता स्वामी श्रीगुरुसमर्था रे ॥ स्थूल सूक्ष्मीं लक्षितां सर्वंहि तुझाचि तूं तत्वता रे ॥
नाना वाद्यध्वनी परि ते नादीं एकात्मता रे ॥ तैसी द्वैतवार्ता नाहीं तुजमाजिं सर्वथा रे ॥धृ०॥
अनेक दिसती व्यक्ती वसुधा शोभे त्या त्या रिती रे ॥ नद नदि वापी कूप उदकीं नाहीं भिन्न जाती रे ॥
घट मठ महदादिकीं नभ हें निर्विकार स्थिती रे ॥ उत्पत्ति स्थिति कल्पांतीं निश्वळ अविनाश निजमूर्ती रे ॥१॥
सर्वभूतीं जगदीश गुज हें सांगे वेदवाणी रे ॥ हाचि निज निर्वाह केला शास्त्रीं आणि पुराणीं रे ॥
सज्जन चिन्मय खाणी हे सुख सांगति तें निर्वाणीं रे ॥ दयाळ साधक जना बोधिति माथां ठेउनि पापी रे ॥२॥
अस्तिभावें पाहातां विश्वचि न पडे ठावें रे ॥ अन्वयव्यतिरेकेंविण उरलें नित्य शुद्ध स्वभावें रे ॥
सहज पूर्ण तें निजानंद पद कवण्या रंगें ध्यावें रे ॥ तन्मय होउनि गर्जति श्रुति अज अनिर्वाच्य नांवें रे ॥३॥

पद ३०५.
(ठोड वीटपर नीट कटीपर या चा. कबीरधाटी अभाग्याच्या घरीं)
कैसी घेतलिसे पाठी जाहली जीवत्वाची साठी वो ॥
मुळिचें वैर साधिलें न बोलवे आटाआटी वो ॥धृ०॥
अवचित याची दिठी पडतांचि नाहीं नाहीं केलें रे ॥
अहंपणाहि लागुनि नुरवी बोले तितुकें ठेले वो ॥१॥
अघटित घटना मायापट हा माझा नेउनि जाळी वो ॥
करूनि उघडी घालवि फुगडी दुर्घट हें कपाळीं वो ॥२॥
हा नाहीं म्हणवुनि जाय तेथें प्रकट याचे पाय हो ॥
सर सर परता म्हणतां न ये निकट ये अपाय वो ॥३॥
नाडियलें बहु येणें याच्या ऐकत होतें गोष्टी वो ॥  
नामरूपहि नुरवी मी पडियलें त्या संकटिं वो ॥४॥
अनाथ मी मज न दिसे कोण्ही पडिलें मौनचि पाहीं वो ॥
दावि तैं निर्वैर निजानंदीं रंग नाहीं वो ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP