पदसंग्रह - पदे ५३६ ते ५४०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ५३६.
याचें कोणें काय नेलें ॥ध्रु०॥
स्वप्नीं राजा रंकपणें ॥ दरिद्रें पिडिलों ह्मणे ॥ अन्नवस्त्र नाहीं ऐसें झालें ॥१॥
स्वरूपविस्मरणें ॥ नानादु:खें भोगणें ॥ नरदेह व्यर्थ वायां गेलें ॥२॥
सहज पूर्ण रंग ॥ निजानंद अभंग ॥ असोनियां ऐसें कैसें झालें ॥३॥
पद ५३७.
दिवसाची हे रात्री मनुजा करिसी कां ॥ध्रु०॥
स्वप्रकाशघन संपत्ती दैवी त्यागुनि आसुरी वरिसी कां ॥१॥
टाकुनि सत्पथ ब्रह्मपुरीचा अविहित मार्ग तूं धरिसी कां ॥२॥
सहज पूर्ण निजरंग उपेक्षुनी विष विरंग हा भरिसी कां ॥३॥
पद ५३८.
केला निश्वय हाचि मनीं ॥ राम जनीं विजनीं ॥ध्रु०॥
तंतु पटीं घटीं मातिच तद्वत् ॥ ऐक्य जना करुनी ॥१॥
ओघ तरंग अनेक विभासती ॥ चित्सागरजिवनीं ॥२॥
सहज पूर्ण जिजरंग सनातन ॥ श्रीगुरु वदपणीं ॥३॥
पद ५३९.
त्वां येउनि सार्थक काय केलें ॥ध्रु०॥
नरदेह दुर्लभ पावुनि कांहीं ॥ स्वहिन न होतां गेलें ॥१॥
जळमथनीं नवनीत न लाभे ॥ विषय सेवितां तैसें झालें ॥२॥
निजरंगें रंगसि ना तैं ॥ जन्मुनि व्यर्थचि मेलें ॥३॥
पद ५४०.
भुलों नको जग मृगजळवत् रे ॥ध्रु०॥
चित्सूर्यावरि नामरुपात्मक भास अशाश्वत रे ॥१॥
शाश्वत मानिति ते नर मृगपशु ॥ वनचर निश्चित रे ॥२॥
सहज पूर्ण निजरंगें सेवीं ॥ स्वात्मसुखामृत रे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP