मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २३६ ते २४०

पदसंग्रह - पदे २३६ ते २४०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २३६.
रविकुळभूपा रे तूं अविनाशा ॥ शरयूतीरनिवासा छेदक भक्तांच्या भवपाशा ॥धृ०॥
मुनिजन-ध्येया रे निज सुख गेया ॥ दीनजनतारण दशमुखमारण कारण जग-नग-कार्या ॥१॥
हदय-शेजे रे तूं निजें ॥ कमलोद्भवकुळबाळा शिळा तारिसि चरणरजें ॥२॥
निज सुखदानीं रे तूं निदानीं ॥ शाश्वत रंग अभंग कराया आदि मध्य अवसानीं ॥३॥

पद २३७.
निज भक्तांलागीं देखा ॥ ब्रह्म भुललें सुखा ॥धृ०॥
भीमरोतिरीं ॥ क्षेत्र पंढरी ॥ जे विटेवरी ॥
कर कटीं धरी ॥ कमलनयन सम चरण विराजित ॥१॥
जें परात्पर शास्त्र गव्हार ॥ श्रुति अगोचर ॥
ध्याति मुनिवर ॥ निर्गुण नित्य निरामय वस्तु ॥२॥
शाश्वत सम पद ॥ विषद विद्नद ॥
त्यात नारद रंगातीत पद ॥ सहज पूर्ण अज अव्यय तूं तूं ॥३॥

पद २३८.
हरिचरणीं रम रम रम रम ॥धृ०॥
व्याध जसा गुणिं लावुनियां शर ॥ तेविं जपें तुज यम यम यम यम ॥१॥
तात भ्रात सुत नैश्वर मानुनि ॥ मोहवनीं न भ्रम भ्रम भ्रम भम ॥२॥
पूर्ण रंग निज रामपदीं मग ॥ काय तेव्हां तुज श्रम श्रम श्रम श्रम ॥३॥

पद २३९. (अभंग)
पाहावें एक चांचपुनी सीत ॥ अवघाचि भात कळों येतो ॥धृ०॥
पुरे हा संसार दु:खाचा सागर ॥ पोहतां हात फार भागले हे ॥१॥
न करवे आतां वावुगी कट कट ॥ न भरे तरि पोट बला गेली ॥२॥
मुष्टिभरी अन्न देईल भगवान ॥ नेसाया कौपिन एक पुरे ॥३॥
हेंही नेदूं तरी नेदुं पंढरीराज ॥ परी आपुलें काज सिद्धि नेऊं ॥४॥
तुझ्या पायांवरि ठेवुनियां हात ॥ वाहातों शपथ पांडुरंगा ॥५॥
न मागें तुज कांहीं संपत्तिवैभव ॥ तुझे चरणीं ठाव देईं आतां ॥६॥
निजानंदें रंगें ह्रदयावकाशीं ॥ विठ्ठला तुजपाशीं हेंचि मागों ॥७॥

पद २४०. (अभंग)
दों दिवसांचा संसार तोही आहाचवणा ॥ कांरे पंढरिराणा भजसी ना ॥१॥
झांकुनियां डोळे घेसि विषय सोहळे ॥ भिकेचे डोहळे आठवती ॥२॥
विचारुनि पाहें खरें काय आहे ॥ शुक-नलिके-न्यायें गुंतलासे ॥३॥
कोश-कीटकापरी आपला आपण वैरी ॥ तैसी तुझी परी झाली मना ॥४॥
ह्मणसि काय करूं पडली माझे गळां ॥ तूंचि अमंगळा न सोडिसी ॥५॥
जीवांचा जीवन जनीं जनार्दन ॥ हात पाय कान दिधले जेणें ॥६॥
ब्रह्मादि पिपिलिका पर्यंत ज्या चिंता ॥ लागली अनंता मुळींहुनी ॥७॥
तेथें तूं बापुडें देहधारि किडें ॥ मेळवितों मी वेडें होऊनि म्हणसी ॥८॥
घालीं उडी आतां धरीं विठ्ठलचरण ॥ निजानंदें पूर्ण रंगोनियां ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP