मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५०६ ते ५१०

पदसंग्रह - पदे ५०६ ते ५१०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५०६.
तुझा उद्धार या पदरजें ॥ आतां ऐक्यभावें तूं भजें ॥ध्रु०॥
हा मुनिजनमनविश्राम वो ॥ हा दीनबंधु पूर्णकाम वो ॥
हा सच्चित्सुखैक धाम वो ॥ सुर्यवंशीं निजमूर्ति राम वो ॥१॥
हा दुर्गम निगमागमासि वो ॥ हा दूरि बहु रजतमासि वो ॥
हा न कळेचि शमदमासि वो ॥ पूर्ण कळलें हें गौतमासि वो ॥२॥
हा निर्गुण नि:संग वो ॥ हा निर्विचार अज अभंग वो ॥
हा चित्समुद्र जगतरंग वो ॥ हा ब्रह्म सहज पूर्ण रंग वो ॥३॥
आजि धन्य धन्य  भाग्य उदय वो ॥ आला दाशरथी सदयह्रदय वो ॥ध्रु०॥

पद ५०७.
हरि गुरु भजन करूं या हा भवसिंधु तरूं या ॥ हातें टाळी मुखें रामनाम उच्चारुं या ॥ध्रु०॥
निगमाचार्य संमतें आत्मानात्म-विवेक करूं या ॥ कोहं कथमिदं जातं संशय हा वारूं या ॥१॥
देहादिक भुवनत्रय विषवत्विषय असें विवरुं या ॥ भक्तिविरक्तिप्रबोधें करुनी षडैवरी मारूं या ॥२॥
देहीं विदेह-स्थितिनें आतां सहज सुखें विचरूं या ॥ सत्संगें निर्द्वंद्वें निजानंदें रंग भरूं या ॥३॥

पद ५०८.
पतित संशयें केला ॥ संशय निरसन होतां कोठें आला ना गेला ॥ध्रु०॥
सार्वभौम निद्रिस्त मंचकीं स्वप्नीं झाला रंक ॥ प्रबोधसमयीं होता नाहिं सोडिला पर्य़ंक ॥१॥
अहं देही ह्मणतां जन्म मरण लागलें पाठीं ॥ नाहं देही ह्मणतां सरता झाला तो बैकुंठीं ॥२॥
अज्ञानाच्या प्रावरणभंगें निजानंदपद भोगी ॥ सहजपूर्ण निजरंगें विचरे चिद्भुवनीं तो योगी ॥३॥

पद ५०९.
गुरुतें शरण न जातें अगई तरी कैसें होतें ॥ पावुनि पुनरपि नाना योनी उपजों उपजों मरतें ॥ध्रु०॥
कोठुनि येणें कोठें जाणें आहे कोण न कळतें ॥ देहबुद्धिच्या बंदीं पडतें षडैवर्‍यां सांपडतें ॥१॥
तवमसि हें वाक्य न पडतें श्रवणीं माझ्या निरुतें ॥ ब्रह्मास्मि प्रत्यय जो यातें समुळीहुनि आंचवतें ॥२॥
ब्रह्मार्पण बुद्धी सत्कर्में अनंत जन्मीं मातें ॥ घडलीं तरि निज रंगें रंगुनि ठेलें हें जरि नसतें ॥३॥

पद ५१०.
पुंडरीकवरदा बिरुदा जतन करी रे ॥ नाहिं तरि सोडुनि टाकीं भीमातटाकीं झडकरि रे ॥ध्रु०॥
तुझिये भजनीं हा विक्षेप होतो कां मज सांगें ॥ योग क्षेम वाह्तों मी ह्मणवुनि बोलिलासि जागे ॥१॥
हे आड घालुनि विषय स्थितिशीं ह्मणसी तूं जरि ऐसें ॥ होत विपत्ती परी हे चित्तीं लागो भजनपिसें ॥२॥
अनुस्यूत तव भजन घडो रेन पडो अंतराय ॥ निजरंगा मी ह्मणेन तुजला तरीच विठ्ठलराय ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP