निर्मळा
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
१.
आनंदें वोविया तुम्हासी गाईन । जीवें भावें वोवाळीन पायांवरी ॥१॥
सुकुमार साजिरीं पाउलें गोजिरीं । ते हे मिरवलीं विटेवरी ॥२॥
कटावरी कर धरोनी श्रीहरी । उभा भीमातीरीं पंढरीये ॥३॥
महाद्वारीं चोखा तयाची बहीण । घाली लोटांगण उभयतां ॥४॥
२.
अनाथांचा नाथ कृपावंत देवा । घडो तुमची सेवा अहर्निशीं ॥१॥
अठ्ठावीस युगें विटेवरी उभा । वामभागीं शोबा रुक्मादेवी ॥२॥
पतितपावन गाजे ब्रीदावळी । पुरवावी आळी हीच माझी ॥३॥
उभा विटेवरी ठेवोनी चरण । म्हणतसे बहीण चोखियाची ॥४॥
३.
चहूंकडे देवा दाटला वणवा । कां न ये कणवा तुजलागीं ॥१॥
सांपडलें संधी संसाराचे संगीं । सोडवीं लगबगीं मयबापा ॥२॥
बहु मज उबग आला असे देवा । धांवें तूं केशवा लवलाहीं ॥३॥
तुजवीण मज कोण गणगोत । तूंचि माझा हितकर्ता देवा ॥४॥
निर्मळा म्हणोनी पायीं घाली मिठी । परतें न लोटीं मायबापा ॥५॥
४.
मज नामाची आवडी । संसार केला देशधडी ॥१॥
सांपडलें वर्म सोपें । विठ्ठल नाममंत्र जपें ॥२॥
नाहीं आणीक साधन । सदा गाई नारायण ॥३॥
निर्मळा म्हणे देवा । छंद येवढा पुरवावा ॥४॥
५.
नाहीं मज आशा आणीक कोणाची । स्तुति मानवाची करुनी काय ॥१॥
काय हे देतील नाशवंत सारे । यांचें या विचारें यांसी न पुरे ॥२॥
ऐसें ज्याचें देणें कल्पांतीं न सरे । तेंचि एक बरें आम्हांलागीं ॥३॥
जो भक्तांचा विसांवा बैकुंठनिवासी । तो पंडरीसी उभा विटे ॥४॥
निर्मळा म्हणे सुखाचा सागर । लावण्य आगर रूप ज्याचें ॥५॥
६.
आतां बहु बोलणें सारोनियां ठेवा । उगवा हा गोंवा मायबापा ॥१॥
संसाराचा छंद नकोसा हा झाला । परमार्थ भला संतांसंगें ॥२॥
जें आहे कडू तें तें लागे गोडू । गोडाचें जें गोडू तें लागे कडू ॥३॥
निर्मळा म्हणे सुख तुमचे पायीं । आणीक मी कांहीं नेणें दुजें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 07, 2015
TOP