मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विठ्ठल चित्रकवि

विठ्ठल चित्रकवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


कमलनयन कान्हा जो उभा कुंजशाई ।
मुरलि मधुर नादें जो वळी लक्ष गाई ॥
शतमिह रुचि लोपे गोपिका मध्यभागीं ।
हृदयिं धरिं मना तूं लुब्ध जो रासरंगीं ॥१॥

हरित वसन कांसे कोटि विद्युत्प्रकाशें ।
नटवर वपु भासे रासरंगीं उभासे ॥
गवळणि गुण वाचे वर्णिती माधवाचे ।
हरित मन जनाचें मालिनीमाजि नाचे ॥२॥

कर्णीं रत्नमणी मृगांक तरणी तेजोप मोठें गणी ।
केयूरें रमणीय कौस्तुभमणी कांसे झणत्किंकिणी ॥
सौवर्णाभरणीं मनोहरमणी जो शोभला भूषणीं ।
तो खेळे तरुणीसवें शिशुगणीं गोपाळचूडामणी ॥३॥

माया पिच्छ जटीं विचित्र मुगुटीं रत्नें महागोमटीं ॥
कांसे पीत धटी मणी मणगटीं मूर्ति स्वयें धाकुटीं ॥
वंशी ओष्टपुटीं सुरेख मुकुटीं खेळे कालिंदितटीं ।
भक्ती ते प्रगटी, अभक्त निवटी स्वस्थान दे शेवटीं ॥४॥

कांसे सोनसळा दिसे झळफळा रंगीत माळा गळां ।
भाळीं पीत टिळा नवीन विपुळा माळा गळां पुष्कळा ॥
कानीं पद्मकळा प्रफुल्ल सकळां गंधें सुगंधागळा ।
खेळे पद्मदलायताकक्ष सकळा वेष्टीत कामाकुळा ॥५॥

संध्यारागपरागचर्चित वपू आरूढ जो उंदिरीं ।
भालीं चंद्र विशाल वर्ण धवला चंद्रार्क नेत्रोदरीं ॥
चक्रांभोजगदांकुशादि धरिले हे आयुधें चौंकरीं ।
ध्याता नाभलगांविंचा गणपती निर्विन्घ भक्तां करी ॥६॥

पाशकार्मुकशरांकुशासनीं ।
जे धरी दुरित घोर शासनीं ॥
ते भजोनि शिखिवाहन शारदा ।
वेदशास्रजननी विशारदा ॥७॥

सद्नुरूसि शरणागत जावें ।
तो म्हणेल तितकें समजावें ॥
तेंचि बीज हृदयांत जपावें ।
साधकें मग तयांत लपावें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP