भानुदासांचे अभंग
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
मोहन मेरो रे साइया ॥ध्रु०॥
जमुना के तट धेनु चरावत । राखत है गैया ॥
मोरपत्र शिरीं छत्र सुहावे । गोपी धरत वाहिया ॥
“भानुदास” प्रभु भगनतको वत्सल । करत छत्र छाइया ॥
आमुचिये कुळी पंढरिचा नेम । मुखीं सदा नाम विठ्ठलाचें ॥
नकळे आकार नकळे विचार । नकळे व्यवहार प्रपंचाचा ॥
असो भलते ठायीं जपूं नामावळी । कर्मांकर्म होळी होय तेणें ॥
भानुदास म्हणे उपदेभ आम्हां । जोडिला परमात्मा श्रीराम हा ॥
नको फिरूं रानींवनीं तूं दुर्घट । सोपी आहे वाट पंढरीची ॥
नको करूं जप तप अनुष्ठान । सोपी आहे जाण पंढरी हे ॥
नको जाऊं तीर्था मनाच्या हव्यासें । जाई तूं उल्हासें पंढरीसी ॥
नको करूं ओग अष्टांग निर्वाण । सोपें तें भुवन पंढरी जगीं ॥
भानुदास म्हणें सोपें वर्म राम । कासयासी श्रम करिसी बहु ॥
पंढरिचें सूख पाहातां अलौलिक । वैकुंठनायक उभा जेथें ॥
देवा जें दुर्लभ भक्तांसी सुलभ । रुक्मिणीवल्लभ उभा विटे ॥
वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ । त्यामाजीं गोपाळ सप्रेमें न चे ॥
जिकडे पाहे तिकडे होय ब्रम्हानंद । भानुदास आनंदे गात असे ॥
चतुर्भुजमूर्ति लावण्य रूपडें । पाहतां आवडे जीवा बहु ॥
वैजयंती माळा किरिटी कुंडलें । भूषण मिरविलें मकराकार ॥
कासे सोनसळा पितांबर पिवळा । कस्तुरीचा टिळा शोभे माथां ॥
शंखचक्र हातीं पद्म तें शोभलें । भानुदासें वंदिलें चरणकमळ ॥
दांभिकाचा देव प्रतिमा धातूची । अज्ञानी जनांची निष्ठा तेथें ॥
योगियांचा देव हातापायांविण । भक्तांचा सगुण विटेवरी ॥
मानसिक पूजा कर्मठांलागीं । केलें कर्म भोगी निश्वयेसी ॥
आमुचा हा देव दोहीं विलक्षण । निरालंब खूण आहे त्याची ॥
साक्षिचाही साक्षी आनंद जिव्हाळा । भानुदास लीला गुज सांगे ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP