“गोवर्धनगडींची, गडींची आई । यमुनाथडीची, थडीची आवा ॥
सांवळ्या वर्णाची, वर्णाची आवू । कोवळ्या मनाची, मनाची आवे ॥१॥
वृंदावनींची, वनींची आई । शंकरमनींची, मनीची आवा ॥
चरणीं गंगा गे, गंगा गे आईं । पापभंगा गे, भंगा ग आवे ॥
बरवी पाऊलें, पाऊलें आई । कुंकुम लाविलें, लाविलें आवा ॥
नखीं ग्रहण, ग्रहण आवू । चंद्राधरण, धरण आवे ॥
सर्प काळी गे, काळी गे आई । गर्व टाळी गे, टाळी गे आवा ॥
बिरिदावळी गे, वळी गे आवू । दैत्यां दळी गे, दळी गे आवे ॥
पोटीं पोटर्या, पोटर्या आई । मांडया बर्या गे, बर्या गे आवा ॥
पिंवळा पाटोळा, पाटोळा कांसे । मेखळा त्यावरी, त्यावरी भासे ॥
नाभीकमळ, कमळ खोल । ब्रम्हा अकळ, अकळ बोल ॥
अंगीं चंदन, चंदनउटी । करुं वंदन, वंदक, अटंक खरें ॥
आपाद वनींची, वनींची माळा । कौस्तुभमणीची, मळीची ढाळा ॥
आजानु भुजा, भुजा गे आई । भेटों तूज गे, तूज गे आवा ॥
कानी कुंडलें, कुंडलें आवू । तेज मांडलें, मांडलें आवे ॥
ओठीं पोवळें. पोंवळें रंगे । दांतीं डाळिंब, डाळिंव भंगे ॥
नासिक सरळ. सरळ साजे । डोळां कमळ, कमळ, लाजे ॥
भोंवया मेडा गे, मेढा गे आई । लाविसि वेड गे, वेडा गे आवा ॥
भाळीं केशर, केशरटिळा । अक्षत माणिक, माणिककिळ ॥
चांचर कुरुळ, कुरूळ माथां । तत्पर प्रेमळ, प्रेमळ नाथा ॥
देखतां भ्रमर, भ्रमर होणें । उतरे जीवाचें. जीवाचें लोणें ॥
मुकुट मयूर, मयूरपत्र । दिसत तरुचें. तरुचें छत्र ॥
त्रिमंग वाजवी, वाजवी पांवा ?। अनंग लाजवी, लाजवी आवा ॥
गोपीगोपाळीं, गोपाळी आई । मुखें हांसत, हांसत बाई ॥
भावार्थं गोंधळी, गोंधळी आवे । प्रीती नाचत, नाचत पाहें ॥
देवां दुर्लभ, दुर्लभ आई । भक्तां सुलभ, सुलभ आवा ॥
रमावल्लभ, वल्लभदासा । समागमाची, गमाची आशा ॥