मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
निर्मळा

निर्मळा

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


१.
संसाराचं भय घेऊनी मानसीं । चोखा मेहुणपुरीसी जाता झाला ॥१॥
देखोनी निर्मळा आनंदली मनीं । धांवोनी चरणीं मिठी घाली ॥२॥
बैसोनी शेजारीं पुसे सुखमात । वहिनी क्षेमवंत आहेत कीं ॥३॥
निर्मळा म्हणे पुढील विचार । कैसा तो साचार सांगें मज ॥४॥

२.
ऐकोनियां मात चोखा सांगे तिसी । पूर्ण नवमासांसी भरियेलें ॥१॥
साहित्यसामुग्री नाहीं कांहीं घरीं । म्हणोनि निर्धारीं बोलियेली ॥२॥
ऐसा हा घोर कोणें वागवावा । म्हणोनि तुझे गांवा वेगें आलों ॥३॥
निर्मळा म्हणे अनुचित केलें । तुम्हां काय वहिलें म्हणों आतां ॥४॥

३.
वडील तूं बंधु असोनि अविचार । केला कां निर्धार सांग मज ॥१॥
न पुसतां कां बा आलासी धांवत । वहिनी आकांत करतील कीं ॥२॥
येरू म्हणे विठू पुरवील सामग्री । भार तयावरी घातिलासे ॥३॥
निर्मळा म्हणे ही बरी नोहे गोष्टी । विठोबासी कष्टी करणें काय ॥४॥

४.
ऐसें आनंदानें एक मास राहिला । परी हेत गुंतला पांडुरंगीं ॥१॥
रात्रंदिवस छंद विठ्ठलनामाचा । नाहीं संसाराचा हेत मनीं ॥२॥
भोजन सारुनी बैसले एकांतीं । निर्मळा बोलती चोखियासी ॥३॥
बहु दिस झाले खंती वाटे मना । पंढरीचा राणा आठवत ॥४॥
गोड धड. जीवासी तें कांहीं । कईं हो डोई पायीं ठेवीन मी ॥५॥
निर्मळा म्हणे अहो देवरया । भेटी लवलाहया देईं मज ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP