भानुदासांचे अभंग
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
चंद्रभागेतीरीं उभा विटेवरी । विठो राज्य करी पंढरिये ॥१॥
ऋद्धि सिद्धि वोळंगती परिवार । न लाहाती अवसर ब्रम्हादिकां ॥२॥
सांडूनि इतुकें येथें केलें । कवणें चालविलें कानडिया ॥३॥
शंख भेरी मृदंग वाजती काहळा । उपवड राउळा होत असे ॥४॥
चापेलमार्जन सुगंधचर्चन । भिंवरा चंदनपाट वाहे ॥५॥
रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका । कामिनी अनेका येती सर्वें ॥६॥
कनकाचे पर्येळीं रत्नाचें दीपक । सुंदर श्रीमुख वोंवाळिती ॥७॥
रखुमाई आई ते जाहली उदास । पुंडलीका कैसें पडिलें मौन ॥८॥
भक्त भाग्वत सकळ पारुषले । नि:शब्दचि ठेले तुजवीण ॥९॥
धन्य पंढरपुर विश्वाचें माहेर । धन्य भीमातीर वाळुवंट ॥१०॥
भानुदास म्हणे चालें आम्हासवें ॥ वाचाऋण देवें आठवावें ॥११॥
जैं आकाश कडकडों पाहे । ब्रम्हाग्ल भंगा जाये ।
वडवानळ त्रिभुवन खाये । तैं मी तुझीच वास पाहें गा विठोवा ॥
न करीं आणिकाचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥ध्रु०॥
सप्तहि समुद्र समरस होती । जैं हे विरुनि जाय क्षिती ।
पंचभूतें प्रळय पावती । तरि मी तुझाचि सांगाती गा विठोबा ॥
भलतैसें जड पडो भारी । नामा न टळों निर्धारी ।
जैशी पतिव्रता प्राणेश्वरी । भानुदास म्हणे अवधारीं गा विठोबा ॥
शिबिका घेऊनि सत्वर । सकळ चालिले सामोरे ।
दिंडया पताकांचे भार । मंगळ तुरें वाजती ॥
वैष्णव करिती हरिकीर्तन । गाती नाचती प्रीति करून ।
क्षेत्रवासी सकळ जन । थोर लहान चालिले ॥
म्हणती भानुदासाचा उपकार । आम्हीं फेडावा कोठवर ।
धन्य हा निधडा वैष्णव वीर । सारंगधर आणिला ॥
न फिटेची तुझा उपकार । द्दष्टीसी दाविलें पंढरपुर ।
मी तुझे वंशीं अवतार । घेईन साचार निश्चिति ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP