रघुनाथांनी कीर्ति मिळविली जन्मुनि भूलोकी ॥
श्रीविष्णूचे मंदिर स्थापुनि गेले सुर-लोकी ॥धृ०॥
पटवर्धन निळकंठा उदरी आले रघुनाथ ॥
सत्कीर्तीचा उभवुनिया ध्वज गेले स्वर्गात ॥
नाही त्यांच्या ऐसा दुसरा त्या सरदारात ॥
दानशूर ते वीर असोनी साधिति परमार्थ ॥
कुरुंद्वाडच्या बैसुनि गादीवरि राज्या करित ॥
होते त्यांनी स्थापन केले श्रीलक्ष्मीकांत ॥
स्नान करिता बघुनि मी झाले अंतरि अति चकित ॥
कृष्णेवरति घाट बांधिला सोपानासहित ॥चाल॥
गजाननाचे मंदिर अति छोटे ॥
सुब्रह्मण्णीचे वरती मोठे ॥
पाहुनि मजला विस्मय मनि वाटे ॥
बघुनी ओर्या धर्मशाळेची जागा अवलोकी ॥
बघत बघत मी सिमा ओलांडुनि गजानना देखी ॥ रघुनाथा०॥१॥
प्रथमारंभी करुन प्रदक्षिणा नमुनी गणपतिते ॥
घालुनि उजवे अश्वत्था-प्रति स्तवि मग विठ्ठलते ॥
पाहुन पशुपति जाय पाहण्या श्रीहरिमंदिर ते ॥
मार्गी येता दिसले मजला स्थानहि मोहक ते ॥
बहुकुसुमान्वित वृक्ष पाहिले गरुडाजवळी ते ॥
मांदारादिक भेदुन गगनाप्रति गेले तरु ते ॥
शमिदूर्वांची दाटी झाली तुळशी बन जेथे ॥
केळि नारळी बकुळ पोफळी जाइजुई तेथे ॥
चुनेगच्चिचे हौद बांधिले दोबाजू सम ते ॥
नाहि न्यूनता फुल-पत्रीची पुजनासी तेथे ॥
विस्मय वाटे ममचित्तासी कोठुन जळ येते ॥
दोमोटांनी वृषभ पाजिती या तरुंना नित ते ॥चाल॥
उत्तर पश्चिम पूर्वेचे द्वारि ॥
येति दर्शना प्रभुच्या नरनारी ॥
घालुनि उजवे जाती माघारी ॥
परि मम-मानस तृप्त न झाले पाहुन क्षणभर की ॥
द्वाररक्षका न मानुनी मी चढले झणि वर की ॥रघुनाथा०॥२॥
सिताबाइकृत पाहुन मंडप दूमजल्यावरती ॥
चढुन विलोकी शिखरी शोभा केली सुंदर ती ॥
कुशलपणाची कमाल झाली मुनिसुरवर मूर्ती ॥
काढुन प्रतिमा तर्हेतर्हेच्या हेम-कळस वरती ॥
छते कोंदणे झालरि दिधल्या हंड्या झुंब्रे ती ॥
कार्तिक मासी दिपवाळीदिनि दीपोत्सव करिती ॥
शक अठराशे दो साली मग प्रासादपूर्ती ॥
सिताबाइनी करुनि आपुली वाढविली कीर्ति ॥चाल॥
शक सत्राशे सत्रा साली हरी अर्चिती राक्षसनामी संवत्सरी ॥
ज्येष्ठमास सित दशमी तिथि ती बरी ॥
पाहुनि सुवेळ विप्र प्रमोदे म्हणती मंत्र मुखी ॥
श्रीकांतांना स्थापुनि केले याचक बहुत सुखी ॥रघु०॥३॥
शंख चक्र आणि गदा पद्म ते चतुर्भुजाधारी ॥
किरिट कुंडले कौस्तुभ मणि वनमाला नाभिवरी ॥
शोभे कंबरि रत्नमेखला झगझगते भारी ॥
पायि पैंजण लाल पितांबर नेसुन जरतारी ॥
करि कडि तोडे रत्नमुद्रिका झळकति बहुतपरी ॥
गोफ पदक नवरत्न चमकती कंठामाझारी ॥
कधि मंदिल कधि फेटा बांधिति प्रभुला पूजारी ॥
शिरपेच कलगी तुरा खोविती मौक्तिक मणि भारी ॥चाल॥
अंगी सुवासिक चंदन उटि केशरी ॥
दिसती नयना लाल ओष्ठ कितितरी ॥
भासे जणु मज भक्षिसि तांबुल हरी ॥
शेज मंदिरी किनखापाद्या गाद्या पर्यंकी ॥
हंतरिळासे मऊ बिछाना कुसुमहार तबकी ॥रघुना०॥४॥
सिंधुसुता श्रीविष्णुसन्निध तिष्ठत वामांगी ॥
नेसे गुलाबी पैठणि भरजरि कंचुकी अंगी ॥
चंद्रकोरसम लावुन कुंकू भरि शेंदुर भांगी ॥
केशरकस्तुरिचंदनमिश्रित उटि चर्चुन अंगी ॥
नथबुगड्या नी भोकरबाळ्या घालुन धवलांगी ॥
गोठ पाटल्या छंद बांगड्या कर अलक्तरंगी ॥चाल॥
पायि पैंजणे दश अंगुलि अंगठ्या ॥
मंगळसूत्रे साज सरी पेट्या ॥
तन्मणि लफ्फा चंद्रहार कंठा ॥
कंबरपट्टा अवळुन दंडी बाजुबंद वाकी ॥
शालुबुट्याचा पांघरुनी श्री तनु आपली झाकी ॥रघुना०॥५॥
लक्ष्मिरमणा हे जगदीशा, भालचंद्रनृपती ॥
रघुनाथांच्या हे वंशातिल कुरुंद्वाडभुपती ॥
नांदत असता महिषीसह ते अंतरि अति झुरती ॥
रात्रंदिन ते संततिवाचुन चित्ती तळमळती ॥
ताटि रुप्याच्या नैवेद्या तुज कोण देइ पुढती ॥
वाढदिवस तव कोण करिल ही वाटे त्या खंती ॥चाल॥
दे मंत्र्यांसह सद्गुण सुत त्यांना ॥
गरुडासन्निध उभि राहुन कृष्णा ॥
प्रार्थितसे तुज येऊ दे करुणा ॥
शक अठराशे चौतिस साली केले कवन मुखी ॥
कृपा-कटाक्षे दीनदयाघन क्षमा करी चुकी ॥रघुना०॥६॥