मी मी मी, मी मी मी, झणी दे, सोडुनि मनुजा ॥धृ०॥
हा माझा वाडा, हा माझा घोडा, मम पदिंचा हा जोडा, वमनासम समजा ॥मी०॥१॥
ही माझी कांता, मम धन सुत दुहिता, मी शाहाणा, अति ज्ञाता मानु नको मनुजा ॥मी०॥२॥
हे माझे व्याही, हे मम जावई, काळ उणा ज्या समयी, कोणि न ये काजा ॥ मी०॥३॥
हे सर्वचि माझे, म्हणता यमराजे, नेतिल रे झणि उमजे, त्यागी तव गमजा ॥मी०॥४॥
श्रीगुरूची वाणी, धरि कृष्णा स्वमनी, परब्रह्मावाचूनि ॥ भाव नसे दूजा ॥मी०॥५॥