मधुर मधुर हरिनाम सुधारस प्राशी मानवा, झडकरि प्राशी मा० ॥धृ०॥
झर झर झर झर आयुष्य सरते, कर कर कर कर सार्थक पुरते ॥
धर धर धर धर हरिपद दृढ ते, त्यागुन तू भवा ॥झ०त्या०॥मधु०॥१॥
औषध दुसरे घेउ नको तु ॥
त्यागुनिया षड्विकार किंतू ॥
विकल्प येता गुण न परंतु ॥
नरकी रौरवा, जाशिल न०॥मधु०॥२॥
नारदमुखिंचा प्राशुनि वाल्हा ॥
निशिदिनि जपता पावन झाला ॥
अवताराच्या वदे चरिताला ॥
विलंब राघवा जरि असे, वि०॥मधु०॥३॥
प्राशियले विष निलकंठाने ॥
शीत होय परि हरिनामाने ॥
म्हणते कृष्ण अति प्रेमाने ॥
तारी बहु जिवा रस हा, तारी बहु०॥४॥