चला सख्यांनो, करविर क्षेत्री जगदंबा पाहू ॥जग०॥
हळदी कुंकू ताटि भरोनी आनंदे वाहू ॥धृ०॥
प्रातःकाळी काकडारती असंख्य जनदाटी ॥असंख्य०॥
नारिनरांची अंगे अदळती शंखजळासाठी ॥
दही दूध घृत मधू शर्करा पंचामृत वाटी ॥पंचा०॥
उष्णोदक बहु सुगंध उटणी ये स्नानासाठी ॥
वाद्य वाजती नौबत कर्णा चौघडा घाटी ॥चौ०॥
पक्वान्नाचे नैवेद्य करुनी आणिति जन ताटी ॥
स्नान अटपता पडदा वर करा अदिमाया पाहू ॥अदि०॥
अंत पार हा नकळे मजला कवणे परि गाऊ ॥चाल॥१॥
लाल पैठणी नेसुन ल्याली कंचुकी अंगा ॥कंचूकी०॥
नेत्री अंजन कुंकुम मळवट भरि शेंदुर भांगा ॥
केशरकस्तुरि चंदन मिश्रित सुगंध सर्वांगा ॥सु०॥
कुसुमहार तो गळा घालुनी शोभे धवलांगा ॥
सागर-तनया श्री विष्णूचे त्यागुनि अर्धांगा ॥त्यागु०॥
दीन अनाथा उद्धारास्तव आलि असे वेगा ॥
लक्ष चौर्याशि योनि हिंडुनी किति तरि जिव श्रमवू ॥२॥
वेणि शेषसम गोंडेफुलांची पाठिवरी लोळे ॥पाठि०॥
बिंदि बिजवरा काप बुगड्या नथ नाकी डोले ॥
मंगळसूत्र तन्मणि लफ्फा पुतळ्या कारले ॥पुत०॥
हार सर झगजग चमके कटि पट्टा अवळे ॥
गोठ पाटल्या छंद बांगड्या पुढे ताशिव तोडे ॥पुढे०॥
दंडी वाकी बाजुबंदाचे लोंबति लाल गोंडे ॥
कृष्णेच्या करि ज्ञानकाकडा उजळुनिया पाहू ॥उ०॥
मम कुलदैवत श्री जगदंबा पदकमली राहू ॥चला०॥३॥