अंत नको पाहु अता धाव माधवा ॥
शिशुपाळ राजयास बंधु देत हा ॥अं०॥धृ०॥
देसोदेशिचे भुपाळ पातले कसे ॥
दाटि रंगमंडपात जाहलि असे ॥
तुजवाचुन श्रीरंगा शून्य मज दिसे ॥
सुदेव विप्र पाठविला येइ यादवा ॥अंत०॥१॥१
वाचुनिया वृत्त सर्व पाहि हे हरी ॥
लग्नसमयि पूजनास देविमंदिरी ॥
जाइन मी त्या समयी हरण मज करी ॥
प्रार्थितसे भीमकजा संकटि महा ॥अं०॥२॥
नंद-नंदनाने सर्व वृत्त वाचुनी ॥
जोडुनिया रहंवरास वारु त्या क्षणी ॥
कुंतलपुरि सेनेसह पातला झणी ॥
अंबालयि रुक्मिण ती आलि तेधवा ॥अंत०॥३॥
पाहुनिया रुक्मिणिचे रूप नृपति ते ॥
चकित होउनि धरणीवरी भुलुन पडति ते ॥
कागातुन मुक्ताफळ हंस हरिति ते ॥
त्यासमान रुक्मिणि ती उचलली पहा ॥अंत०॥४॥
जिंकुनिया सकल नृपा जाति द्वारके ॥
करुनि समारंभ लग्न लाविले निके ॥
रुक्मिणिवर माझि दीनवाणि आइके ॥
म्हणे कृष्णा पदकमली नेसि केधवा ॥अंत०॥५॥