गोपीनाथा आले, आले, सारूनिया काम रे ॥
वृंदावनि वाजवीसी वेणू जरा थांब रे ॥गोपी०॥धृ॥
एक गोपी म्हणे माझ्या घरी आले पाहुणे ॥
बहिणीचे पती माझे होति सखे मेहुणे ॥
स्वयंपक सोडोनिया येता झाले श्रम रे ॥गोपी०॥१॥
म्हणे दूजी हरी तुझी मुरली रागी रंगली ॥
हीच्या नादे आज माझी पती-सेवा भंगली ॥
विडा करिता करिता आले सुटला भाळी घाम रे ॥गोपी०॥२॥
तिसरी म्हणे हरी माझी सासू बहू तापट ॥
कुंजवनी येत होते मारूनिया करी पिठ ॥
आता कैसी येऊ दे देवा भजते तुझे नामरे॥गोपी०॥३॥
चवथी नारी माळीयाची जात होती सासरी ॥
अवचीत मुरलिचा नाद भरे अंतरी ॥
द्राक्षे अननस आम्र आणिली केळी जांब रे ॥गोपी०॥४॥
यमुनाबाई वाहे स्थिर नादे लब्धला समीर ॥
हालवीअन तरूवर सुमने फळे पान रे ॥गोपी०॥५॥
वेडावली वेदश्रुती खुंटे अनंताची मती ॥
तेथे कृष्णाबाई किती वर्णी घनश्याम रे ॥गोपी०॥६॥