पोचवी पैल तीराते श्रीराम विनवि गुहकाते ॥
तुम्हि कोण कुणाचे स्वामी मज कथन करा या कामी ॥
तू ऐक सांगतो आम्ही वसतसो अयोध्या ग्रामी ॥
पाळिले पितृवचना मी करितसे गमन विपिना मी ॥चाल॥
गुहकाची ऐकुन माता ॥
म्हणे नावेवरि रघुनाथा ॥
नको बसू देउ तू आता ॥
हा करिल हिला नारीते ॥
अनिवार विघ्न वारी ते ॥श्रीराम०॥१॥
याचि कीर्ति प्राचिन काली ऐकिली आम्ही जी झाली ॥
हा जाता आपुल्या चाली पदधुळी शिळेवर गेली ॥
रंभेसम कामिनि झाली श्रीरामपदांबुजि रमली ॥चाल॥
काष्ठाच्या नावेवरती ॥ हा चढता अगणित युवती ॥
होतील गळा मग पडती ॥
पोशिता एक अबलेते तव त्रेधा निशीदिनि होते ॥श्रीराम ॥२॥
हसू येत मनी रामासी, पाहोनि भक्तप्रेमासी ॥
पोचवावया आम्हासी परतिरा वित्त किति घेसी ॥
म्हणे गुहक पूर्णकामासी करि पावन मम धामासी ॥चाल॥
चल ऊठ अता श्रीरामा ॥
घे बंधु सिता घनशामा ॥
ही रात्र क्रमवि विश्रामा ॥
तव चरण धुइन मम हाते करि सेवन फल-हाराते ॥श्रीराम०॥३॥
भव भक्ती अष्ट भावे पूजिनि म्हणे या नावे ॥
वरि बसुनि पर तिरा जावे ॥
बालका कधि न विसरावे ॥
वनवास करुनि झणि यावे ॥
या दासा दर्शन द्यावे ॥चाल॥
तू धेनू वत्स मि तुझे ॥
तू हरिणी पाडस समजे ॥
तव दीननाथ ब्रिद गाजे ॥
हरि शीघ्र त्रिविध तापाते ॥
करि पावन या कृष्णेते ॥श्रीराम०॥४॥