चलागे कृष्णातिरि जाऊ ॥
कुरुंद्वाडच्या दत्तअळीमधे मुरलीधर पाहू ॥धृ०॥
मला ते क्षेत्रची हो गमते ॥
श्रीविष्णूचे मंदिर बघता मन तेथे रमते ॥
अवधुत- रघुवीर-मंदिरि ते ॥
रम्य दिसे मज छोटे परि हे मुरलीधर जेथे ॥
सुशोभित बाइ मला दिसते ॥
देवालय ते दृष्टी पडता ये शांतिस भरते ॥
सख्यांनो शीघ्र तिथे जाऊ ॥
गरुडासन्मुख उभ्या राहुनी प्रभुचरणा पाहू ॥चला०॥१॥
नसे कधि योग्यांणा दिसला ॥
काशिबाइच्या भावास्तव तिज सदनी तो बसला ॥
त्यजुनी झणि श्रीमंताला ॥
नाभी नाबी काशी म्हणुनी निज वक्त्रे वदला ॥
वसंती वैशाखी प्रभुला ॥
शुक्ल दशमिच्या दिवशी मिरवित मिरवित गे अणिला ॥
मनासी मोद तिच्या झाला ॥
शक अठराशे बत्तिस साली सिंहासनि बसला ॥
अशा स्थळि मन अपुले रमवू ॥
नवविध भक्ती घेउन संगे मस्तक हे नमवू ॥चला०॥२॥
आधी मी प्रभुचरणा नमिते ॥
पायी पैंजण वाळे नूपुर प्रेमे मग बघते ॥
नेसले पीतांबर प्रभु ते ॥
भरजरि शेला शोभे ह्रदयी वनमाला दिसते ॥
कधी कधि फेटा बांधित ते ॥
कधि रत्नाच्या मुगुटावरती कोंदण झगझगते ॥
कपाळि केशरि चंदन ते ॥
कानि कुंडले लाल वदन जणु तांबुल भक्षिति ते ॥
करामधि मुरली घेउन ते ॥
वाजविता हरि राधाबई पुरे पुरे म्हणते ॥
नसे मज ज्ञान कसे गाऊ ॥
वेडेवाकडे बोल बोबडे बोलुन पदि राह ॥चला०॥३॥
बघागे राधेची मूर्ती ॥
क्षीराब्धीची वाटे तनया आली भूवरती ॥
कसूनी भरजरि पैठणि ती ॥
कलाबतूची फुले काढिली कंचूकीवरती ॥
शसीसम कुंकुम मंडित ती ॥
नेत्री अंजन मंगळसूत्रे करि कंकण असती ॥
नटुनी शृंगारी बहु ती ॥
पायी पैजण वाजवि रुणझुण हरि मन रंजवि ती ॥
बघे हरिदासा ही भूलवू ॥
निजरूपाने मोहित करुनी ईप्सितपद चुकवू ॥चला०॥४॥
मनोहर रूप असे प्रभुचे ॥
वर्णन करिता थकली श्रुतिही तेथ मला कैचे ॥
परी त्या काशीबाईचे ॥
फार मनोरथ होते म्हणुनी वदले मी वाचे ॥
विसर्जन झाले जरि तनुचे ॥
परी जिवा बा स्मरण धरावे दिनरजनी हरिचे ॥
अखंडित नामामृत घेऊ ॥
म्हणते कृष्णा मुरलिधराच्या पदि मस्तक ठेवू ॥चला०॥५॥