जय जय श्री गुरुदत्ता ॥
तुजवाचुनि मजला कोणी न त्राता ॥जय०॥धृ०॥
काय करू समजेना ॥ भवपुरितुनि कशि सुटू हे उमजेना ॥
हे मन भजन भजेना ॥ माझे म्हणुनी धावते विषय त्यजीना ॥
नामामृत पाजी पान्हा ॥ मी चातक तू मेघ अत्रिनंदना जय०॥१॥
तोषविले स्वजनासी ॥ नाही शांती क्षमा दया मनासी ॥
केवळ पातकराशी ॥ धक्का लाविला माउलीउदरकमळासी ॥
अत्रिसुता तेजोराशी ॥ सोडी अनुसूयानंदना भवाब्धीसी ॥जय०॥२॥
मी वत्स तू धेनू दत्ता ॥ मी पाडस तू हरिणी भासे मम चित्ता ॥
मी बालक तू माता ॥ नाही तुजसम त्रिभुवन शोधुनि पहाता ॥
थकली श्रुति वेद गाता ॥ तेथे काय ही कृष्णा गाईल गाथा ॥जय०॥३॥