ये धावत रामा ॥ वसे मम ह्रदयी विश्रामा ॥
शरयू तिरि तव वास निरंतर अयोध्या ग्रामा ॥
ध्वज वज्रांकुश चाप शर करी, सन्मुख बलभीमा ॥वसे०॥१॥
कौसल्यासुत, दशरथतनया ॥ करि पावन आम्हा ॥
त्रिवर्ग बंधू सन्निध असती श्री मेघश्यामा ॥वसे०॥२॥
किरिट कुंडले कौस्तुभ साजे शिव घे तव नामा ॥
विशाळ भाळी तिलक कस्तुरी, शोभे सुखधामा ॥वसे०॥३॥
रूप साजिरे, ध्यान गोजिरे मम अंतर्यामा ॥
सतत वसो दे, म्हणते कृष्णा नित्य जडो प्रेमा ॥वसे०॥४॥