यशोदा काकू हो राखावी गोडी ॥
तुमच्या मुलामुळे करू आम्ही तोडी ॥धृ०॥
दूध विकावया मथुरेसी जाता ॥
मारितो खडे हा मम प्राणनाथा ॥य०॥१॥
सात मासांचा बालक माझा ॥
तुम्हि बारा घरच्या बालट बाजा ॥य०॥२॥
दुसरी म्हणे मम बालक तान्हे ॥
आणून ठेवीले बिदिवरि याने ॥य०॥३॥
सांगता चाड्या असती ह्या खोट्या ॥
मम तान्हे लेकरू तुम्हि नाल मोठ्या ॥य०॥४॥
हा गोपाळ असुरांचा काळ ॥
तुज वाटे बाळ हा असे खोडाळ ॥य०॥५॥
धन्य गोपीका यशोदा तो नंद ॥
दिनरजनि कृष्णेसि श्रीकृष्णछंद ॥य०॥६॥