सांगा शंकर मी अर्धांगी कवण्या सुकृते हो बसले ॥सां०॥धृ०॥
स्मशान-वासी सर्वांगासी चर्चुनि विभुती शिरि गंगा ॥
सुहास्य वदने पुसते गिरिजा बसुनि शिवाच्या अर्धांगा ॥सां०॥१॥
प्राणवल्लभे हिमनगदुहिते पितया सदनी तू असता ॥
ब्रह्मसुताच्या आज्ञे वर तुज विष्णु योग्य दिसे हनुमंता ॥सां०॥२॥
प्राणप्रिये तू वचन पित्याचे ऐकुनि होसी कोपि मनी ॥
एक शंकरावाचुनि जगती नर तुजसमान जाण मनी ॥सां०॥३॥
सखिसदनासी लगबग जासी घेउनि तिजला वनि निघसी ॥
घोर विपीनी रजनीमाजी रिस-व्याघ्रांसी नच भीसी ॥सां०॥४॥
मास भाद्रपद शुक्ल तृतीया पूजिसि मजला प्रेमभरे ॥
अर्कपत्र त्वा भक्षण करुनी जागर गायन मधुर स्वरे ॥सां०॥५॥
उपोषीत तू सखिसह अससी करिसि पारणा द्वितिय दिनी ॥
भावार्थाते भुलुनि तुझ्या मी आलो तापसि होवूनी ॥सां०॥६॥
गज चर्मावर पायि खडावा दंड कमंडलु घेउनिया ॥
प्रसन्न झालो तुज नगतनये मागे इच्छित या समया ॥सां०॥७॥
जरि मज देसी इच्छित वर तू भोला त्रिंबक पति देई ॥
असत्य वाणी होइल जरि ही त्यागिन प्राणा या ठायी ॥सां०॥८॥
अस्तु तथास्तु पुरेल मनोरथ न करी चिंता मृगनयने ॥
स्वस्थानाते शंकर गेला हिमनग शोधितसे विपिने ॥सां०॥९॥
गिरी कंदरी पुरी पट्टणी शोधुनि नगपति मनि विवळे ॥
आम्रतरुतळि सखिसह निद्रा करिता देखिलि हिमाचले ॥सां०॥१०॥
सद्गद कंठे धाउनि गिरिपति धरि अंकावरि आलिंगी ॥
कवण्या कार्या आलिस येथे गांजियले कुणि कथि वेगी ॥सां०॥११॥
हे धरराया पडते पाया भोळा शंकर देइ पती ॥
हेतु मनीचा पूर्ण न होता त्यगिन प्राणा ह्या जगती ॥सा०॥१२॥
बरे म्हणुनिया सखिसह शिबिके घालुनि आणिलि स्वस्थाना ॥
पाचारुनिया सकल सुरवरा अर्पिलि कन्या त्रिनयना ॥सा०॥१३॥
हरतालीका व्रतप्रतापे मम मानस त्वा गे हरिले ॥
तुज त्या योगे वामांकावरि अखंड पार्वति म्या धरिले ॥सां०॥१४॥
सखिगौरीहर पूजिति नारी, शुक्ल भाद्रपद तृतिय दिनी ॥
अखंड मिळवुनि सौभाग्या अंती जातिल शिवसदनी ॥सां०॥१५॥
कर्पुरगौरा चंद्र्शेखरा सतत बसावे मम ह्रदयी ॥
शिवचरणांबुज नमिते कृष्णा, तव गुण गाया मति देई ॥सा०॥१६॥