श्रियाळ-अंगणी शिव आले ॥
अंगी भस्म चर्चियले ॥
व्याघ्रगजचर्म ओले ॥
डमरू त्रिशुळा करि धरिले ॥
मणिमय आसनि शिव पुजिले ॥
इप्सित मागा नृप बोले ॥
हे काय चांगुणे शिर रक्षियले ॥
बोलती यति कोपे ॥
ऐकुनि थरथर सति कापे ॥धृ०॥१॥
मागावे गा यतिराया ॥
ईप्सित देइन या समया ॥
राज्य अथवा मम जाया ॥
अर्पिन मी मत्प्राणा पाया ॥
ह्यातिल नलगे मज राया ॥
आवडे बालक तव चिलया ॥
चिरुनी शिजवी लवलाह्या ॥
क्षुधित मी वाढी जेवाया ॥ हे काय०॥२॥
सतिने बालक करि धरिला ॥
करकर शिवनामे चिरिला ॥
मोहे रक्षित शिरकमला ॥
शरिरा शिजवुनि म्हणे यतिला ॥
यावे क्षुधित बहु झाला ॥
माध्यान्हीसी रवि आला ॥
अंतःसाक्षी शिव भोळा ॥
जाणे राखिले मुखकमला ॥ हे काय०॥३॥
जातो जातो नृपनष्टा ॥
हरिले सत्वा कृतिभ्रष्टा ॥
दंतखावुनिया ओष्ठा ॥
क्रोधे बोले शिव द्रष्टा ॥
कळले कृत्रिम पापिष्ठा ॥
कैसे रक्षिसि शिर नष्टा ॥
दवडिसी लौकिक तू मोठा ॥
शिजवुनी शरिराते दुष्टा ॥
पसरलि सत्कीर्ती राष्ट्रा ॥
म्हणुनी आलो गर्विष्ठा ॥
केला मोक्षपदी तोटा ॥
भोगी यमपुरीचा वाटा ॥ हे काय०॥४॥
थांबा थांबा महाराजा ॥
धावे चांगुणा-राजा ॥
नेणत अपराध माझा ॥
घडला जोडितसे भूजा ॥
आणिले शिर ने दरवाजा ॥
द्यावी आज्ञा मज काजा ॥
दोघे मस्तक तुम्हि घ्या जा ॥
कांडुनी सुंदर गित गा जा ॥
पचवुनी बालक मग माझा ॥
वाढा तोषेल शिवराजा ॥ हे काय०॥५॥
वेगे उखळ आणवीले ॥
धैर्यै मूसळ करि धरिले ॥
माया मोहाते त्यजिले ॥
चिलया बाळा कांडियले ॥
ऐसे यति नच कधि आले ॥
त्यांसी बालक अर्पियेले ॥
धन्य बाळा कुळ केले ॥
स्वर्गी शंकर तोषविले ॥ हे काय०॥६॥
आम्हा टाकुनिया जासी ॥
बाळा माता परदेशी ॥
केवळ पापिण राक्षसी ॥
चिरुनी कांडितसे तुजसी ॥
जेविता यतिवर देहासी ॥
त्यागुनी येइन तुज-सरसी ॥
थांबे थांबे जननीसी ॥
ठेवी जागा कैलासी ॥
मायिक मातापितयांसी ॥
त्यागुनी मोक्ष-पदी वससी ॥ हे काय० ॥७॥
सत्वर वाढी नृपराया ॥
आणिले पात्र लवलाह्या ॥
बसले शंकर जेवाया ॥
म्हणती यावे तुम्हि उभया ॥
वदते चांगुणा पतिराया ॥
बैसा बालक भक्षाया ॥
त्रिभुवनि मज-ऐसी माया ॥
नाही भक्षितसे चिलया ॥
उठिले शंकर तेथुनिया ॥
जाती स्मरले त्या समया ॥ हे काय० ॥८॥
निपुत्र अससी नृपनाथा ॥
नलगे भिक्षा मज आता ॥
पडली महिवर ती कांता ॥
बघसी अंत किती आता ॥
संकट हिमनगजामाता ॥
वारी विघ्नहराताता ॥
सांगति यतिवर नृपनाथा ॥
मारी हाका त्वा सूता ॥ हे काय० ॥९॥
पाचारी ते सतिबाळा ॥
धावे चिलया वेल्हाळा ॥
त्या नगरीचा जन-मेळा ॥
ढाळिती दुःखाश्रू डोळा ॥
बालक मजवरि का रुसला ॥
अतिथ हा तुजसाठी बसला ॥
ऐकुनि माता वचनाला ॥
चिलया धावतचि आला ॥
वंदुनि यतिवरचरणाला ॥
उधळिती सुरवर सुमनाला ॥ हे काय० ॥१०॥
त्यागुन अतिथि वेषाला ॥
दश-भुज पंचानन झाला ॥
धरिले वामांकी बाला ॥
दोघे वंदति पदकमला ॥
प्रसन्न झाला शिवभोळा ॥
ईप्सित मागे भूपाळा ॥
मिरवित कैलासी नेला ॥
शिवगणि शिवपदि स्थापियला ॥
धन्य धन्य शिव-लीला ॥
चिलया सिंहासनि बैसला ॥ हे काय० ॥११॥
लडिवाळ बालक कृष्णेसी ॥
व्हावी स्फूर्ती रसनेसी ॥
मर्कट मन हे विषयांसे ॥
भुलते स्थिर करी यासी ॥
गाइन शिव गुणलीलेसी ॥
याविणे अन्य नको मजसी ॥
गाती ऐकति कवनासी ॥
ईप्सित फलप्राप्ती त्यांसी ॥ हे काय० ॥१९॥