पहिली प्रदक्षिणा, केली गजानना ॥ देई माझ्या मना, सुबुद्धीते ॥१॥
दुसरी प्रदक्षिणा, केली मोरेश्वरा ॥ चौर्याशीचा फेरा, शीघ्र सोदी ॥२॥
तिसरी प्रदक्षिणा, केली विनायका ॥ दावी मोक्ष लोका, शीघ्र माते ॥३॥
चवथी प्रदक्षिणा, केली वक्रतुंडा ॥ क्रोध गजशुंडा, तोडी माजी ॥४॥
पाचवी केली आता, अंबीकेच्या पुत्रा ॥ दावी ज्ञानमित्रा, झणी माते ॥५॥
साहवी प्रदक्षिणा, ऋद्धि-सिद्धि-नाथा ॥ संसारात आता, घालू नको ॥६॥
सातवी केली आता, मोरयाच्या भोती ॥ संसाराचे किती, दुःख सांगू ॥७॥
आठवी प्रदक्षिणा, माझी शूर्पकर्णा ॥ नको जन्ममरणा यातायाती ॥८॥
नववी केली भावे, मदनारी बाळा ॥ दावी विश्व-पाळा, पाय तुझे ॥९॥
दहावी प्रदक्षिणा, चौदा विद्यावंता ॥ हरी माझी चिंता, संसाराची ॥१०॥
अकरा प्रदक्षिणा, झाल्या गणपती ॥ देई मज मती, बारावीते ॥११॥
बारा करुनीया, पुढील तेरावी ॥ करिते हरावी, कुबुद्धि जी ॥१२॥
तेरा झाल्या पुर्या, करिते नमस्कार ॥ होवो चिंता दूर, एकदंता ॥१३॥
चौदा संपवुनी, घाली लोटांगण ॥ देई वरदान, प्रेमानंदे ॥१४॥
पंधरावी चालली, माझी चिंतामणी ॥ सोसेना काचणी, प्रपंचाची ॥१५॥
सोळा प्रदक्षिणा, करुनी नमन ॥ प्रार्थी मी चरण, दावी मज ॥१६॥
सत्रा प्रदक्षिणा, केल्या मोरयाला ॥ दोष हरायाला, संचिताचे ॥१७॥
अठरावी घालूनी, मागतसे तुला ॥ साह्य करो मला, राणी तुझी ॥१८॥
विघ्नहरा तुज, एकुणीस केल्या ॥ वासना त्या गेल्या पळोनिया ॥१९॥
वीस करूनीया, पाहिले म्या मुख ॥ झाले बहु सुख, कृष्णा म्हणे ॥२०॥