कैलासी चल मना पाहु शंकरा ॥
सिंहासनि विलसत जो वंद्य सुरवरा ॥धृ०॥
भस्मभूषित सकल तनू शेषभूषणा ॥
शोभतसे सव्य गणू वामि अंगना ॥
व्याघ्रांबर पांघरले वृषभवाहना ॥
जटि गंगा वाहतसे चंद्रधारणा ॥चाल॥
उमाधवा त्यजुन भवा धरिरे अंतरा, सदा धरिरे अंतरा ॥कै०॥१॥
त्यागि काम त्यागि क्रोध त्यागि वासना ॥
त्यागि त्रिगुण त्यागि विषय त्यागि कामना ॥
काइक वाचिक मानसीक द्वैत भावना ॥
त्यजुन सांब-चरणकमळि लीन हो मना ॥चाल॥
कसा वृथा अशाश्वता गुंतसी नरा, सदा गुं० ॥कै०॥२॥
भक्त-प्रेम अधिक असे मदनअंतका ॥
काढुनिया आत्मलिंग दिले दशमुखा ॥
अर्पियली निजकांता माय अंबिका ॥
अशा सांब-चरणि कृष्णि भाव धरि निका ॥चाल॥
नतावरी दया करी सतत शंकरा, प्रभो सत० ॥कै०॥३॥