काय सांगू यशोदे ग करितो खोड्या तव कुमार ॥
जावे गोकुळ सोडुनि हे नलगे अम्हा संसार ॥धृ०॥
काल रात्री घरि आला; घेउनि संगे संवगडे ॥
डेरा माझा फोडियला ॥
टाकुनि दहि-दुध ऊघडे ॥
सारे माझे दूध प्याला ॥
बघुनी मन झाले वेडे ॥ काय०॥१॥
दुसरी म्हणते साजणी ॥
ऐके पोराची खोडी ॥
निजलो आम्ही सुखशयनी ॥
साधुनी संधी बहु थोडी ॥
न कळे आला कोठूनी ॥
बांधिलि वेणी पति-दाढी ॥काय०॥२॥
तिसरी म्हणते ऐक आता ॥
सार्या खोड्या पोराच्या ॥
लेकी माझ्या कुलवंत ॥
सुना आणिल्या थोरांच्या ॥
झाल्या संसारी वेड्या ॥
बघुनी खूणा जाराच्या ॥काय०॥३॥
कडेवर घागर करि कळशी ॥
जाता यमुना बाईला ॥
जाणुनि वेळा हरि आडवा ॥
येउनि तिष्ठत राहिला ॥
म्हणतो चल गे कुंजवनी ॥
फुले फुलली जाईला ॥काय०॥
धन्य गोकुळ यशोदा ती ॥
धन्य वृजवासी ललना ॥
वर्णन करिता हरि लीला ॥
थकली धरणीधररसना ॥
तेथे मंदमती कृष्णा ॥
गाइल कैसी हरी गुणा ॥ काय०॥५॥